Maharashtra Omicron Alert: महाराष्ट्राची लॉकडाऊनकडे वाटचाल, ओमीक्रॉनसंबंधी केंद्र सरकारच्या पत्राने शंका वाढली

8 more patients found infected Omicron in Maharashtra

जगभरात कोरोनाचा नवा वेरियंट ओमीक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असून भारतातही ओमीक्रॉन रुग्ण वाढत आहेत. त्यातही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ओमीक्रॉन रुग्णांचा आकडा वाढत आहे. नुकतेच राज्यात ओमीक्रॉनचे ११ नवीन रुग्ण आढळले असून यातील ८ जण एकट्या मुंबईत आहेत. दुबईहून नागपूरला आलेले ४ प्रवासी कोरोना पॉझीटीव्ह आहेत. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या एकट्या महाराष्ट्रात ओमीक्रॉनचे ६५ रुग्ण आहेत. इतर राज्यातील ओमीक्रॉनच्या रुग्णसंख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे. यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवले असून अलर्ट राहण्याचा आणि गरज पडल्यास अधिक कडक निर्बंध लागू करण्याचा सूचना दिल्या आहेत.

दररोज १४ लाख बाधित- कोवीड टास्क फोर्सने व्यक्त केली भीती

ओमीक्रॉनचा वाढता संसर्ग वेग पाहता देशात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ओमीक्रॉनने डेल्टा वेरियंटची जागा घेतली तर देशात दररोज १४ लाख नागरिकांना ओमीक्रॉनची लागण होईल अशी शंका भारतीय कोरोना टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. भारताच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख वी के पॉल यांच्या मतानुसार जानेवारीच्या सुरुवातीलाच ओमीक्रॉनचा संसर्ग वेगात होणार असून फेब्रुवारी पर्यंत ओमीक्रॉनचा स्फोट होण्याची शक्यता वर्तवली आहे. ओमीक्रॉनची लक्षणे जरी सौम्य असली तरी त्याच्या संसर्गाचा वेग अधिक असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णसंख्या अधिक असलेल्या राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध घालण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य विभागाने राज्यांना पाठवलेल्या पत्रात ओमीक्रॉनच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी जाहीर कार्यक्रम, रात्रीची संचारबंदी, लग्न, अंत्यसंस्कार विधी, मुंजीच्या वेळी गर्दी न करण्याचे संकेत या पत्रात देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी करण्यास बंदी घाला अशा स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने या पत्रात राज्यांना दिल्या आहेत. यात कार्यालय, कंपन्या, कारखान्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यास आरोग्य विभागाने राज्यांना सांगितले आहे.

देशात सध्या १४ राज्यांमध्ये ओमीक्रॉनने शिरकाव केला आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या २२० वर पोहचली आहे. यात सर्वाधिक ओमीक्रॉन बाधित महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ६५ ओमीक्रॉन बाधित आहेत. त्यातील ३० रुग्ण मुंबईत असून दिल्लीत ५४ आणि तेलंगणामध्ये २४ ओमीक्रॉनग्रस्त आहेत. हा वाढता आकडा पाहता येत्या काही दिवसात राज्य सरकार आवश्यकता असल्यास लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकते याची दाट शक्यता आहे.