घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : आरोप करणाऱ्यांचे शेकडो फोटो दाखवता येतील; शिंदे गटाचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : आरोप करणाऱ्यांचे शेकडो फोटो दाखवता येतील; शिंदे गटाचे प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा, खासदार श्रीकांत शिंदे आणि कुख्यात गुंड हेमंत दाभेकरसोबतचा फोटो ट्वीट केला होता. यानंतर आज, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गुंड निलेश घायवळचा फोटो संजय राऊत यांनी ट्वीट करत टीकास्त्र सोडले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनीही ट्वीट करत एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवर टीकास्त्र सोडले होते. अशातच आता शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी दोन्ही नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Politics Hundreds of photos of accusers can be shown Shinde group reply to opponents)

हेही वाचा – Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ‘बेपत्ता’; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना दादा भुसे यांना एकनाथ शिंदे यांच्या गुंडासोबतच्या फोटोबाबत विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री सतत जनतेच्या गराड्यात असतात. आपण बघितलं असेल तर यापूर्वी वर्षा बंगल्यावर ठराविक लोकांना त्या ठिकाणी प्रवेश असायचा. मात्र आज वर्षा बंगल्यावर सर्वसामान्य माणूस जाऊ शकतो. त्याच्या काही अडचणी, त्याची काही समस्या असेल तर तो मांडतो. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांच्या आणि गुंडाच्या भेटीचं समर्थन करणार नाही, पण इतक्या किरकोळ गोष्टीचं बाऊ करणं चुकीचं आहे. जे आता आरोप करत त्यांच्यासोबतचे शेकडो फोटो आपल्याला दाखवता येतील. त्यामुळे लगेच कोण चांगलं झालं आणि कोण वाईट झालं अशातला काही भाग नाही. कारण गुंड प्रवृतीचं कोणी समर्थन करणार नाही. आपण बघितलं असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्याचं धोरण आपल्या सरकारचं आहे, असे दादा भुसे म्हणाले.

हेही वाचा – Piyush Goyal : पीयूष गोयल मुंबईतून लोकसभा लढण्याची शक्यता; ‘या’ भाजपा आमदाराचा पत्ता होणार कट?

- Advertisement -

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना ‘महाराष्ट्रात गुंडाराज’ असे शीर्षक देऊन एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, “महाराष्ट्रात गुंडा राज, गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तृत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते का? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. आज ही काय अवस्था करून ठेवली आहे, मोदी-शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.

“मोदी की गॅरंटी”? म्हणत वडेट्टीवारांकडून टीकास्त्र

दरम्यान, विजय वडेट्टीवर यांनीही ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की, महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण-तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्त्वाचे दिवस घालवत आहेत. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. असे असताना इकडे सरकार गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहेत. हीच का ती “मोदी की गॅरंटी”? असा प्रश्नही विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -