घरमहाराष्ट्रआता युपीए अस्तित्त्वात नाही - ममता बॅनर्जी

आता युपीए अस्तित्त्वात नाही – ममता बॅनर्जी

Subscribe

आता युपीए वगैरे अस्तित्वात नाही. जे लढत नाहीत त्याला काय करणार, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. केंद्रातील मोदी सरकारविरोधात आघाडी उघडणार्‍या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीनंतर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ममता बॅनर्जी यांची काँग्रेसवर असलेली नाराजी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ममता म्हणाल्या की, माझ्या मुंबई दौर्‍यात मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते. मात्र, त्यांना भेटता आले नाही. आज मी शरद पवार यांची भेट घेतली. देशात फॅसिझमचे वातावरण असून या फॅसिझमच्या विरोधात एक मजबूत आघाडी बांधली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सर्वांनी लढले पाहिजे, असे ममता दीदी म्हणाल्या.

- Advertisement -

यावर पत्रकारांनी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला यूपीएचे नेतृत्व करायला हवे का?, असा प्रश्न विचारला. ममतादीदींना हा सवाल तितकासा रुचला नाही. या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, देशात आता यूपीए शिल्लक राहिलेले नाही.

मजबूत पर्याय उभा करणे आवश्यकशरद पवार
ममतादीदींच्या भेटीनंतर पवार म्हणाले की, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचे नाते जुने आहे. ते आणखी सकस होण्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आहेत. बुधवारी मी आणि माझ्या सहकार्‍यांची त्यांनी भेट घेतली. राष्ट्रीय स्तरावर जी परिस्थिती आहे ती पाहता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. देशात एक नवा मजबूत पर्याय उभा करणे अत्यंत आवश्यक आहे.

- Advertisement -

यावेळी उभी राहत असलेल्या या नव्या आघाडीत काँग्रेस असेल का असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला. त्यावर पवार म्हणाले की, काँग्रेस नसेल असे मी बोलत नाही, मी म्हणतोय की सर्वांनी एकत्र येण्याची आज गरज आहे. केंद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात जे कोणी लढायला तयार आहेत, अशा सर्वांना एकत्र घेतले जाईल. ममता बॅनर्जी आणि आमच्यात अतिशय सकारात्मक चर्चा झाली, असेही पवार म्हणाले.

काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय –नाना पटोले

भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पाहत आहे. वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपविरोधातील लढाई अहंकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. मुंबई दौर्‍यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपच्या या हुकूमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपविरोधात ठामपणे उभे राहिले. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -