Maratha Reservation: माझे व कुटुंबीयांचे बरवाईट झाल्यास हे राजकीय नेते जबाबदार, याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा खुल्या गुणवंतांचा विजय आहे तर ५२ मोर्चांचा पराभव आहे.

Maratha Reservation petitioner Gunaratna Sadavarte warns Political leaders are responsible in case of harm to me and my family
Maratha Reservation: माझे व कुटुंबीयांचे बरवाईट झाल्यास हे राजकीय नेते जबाबदार, याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रकरणी आज सुनावणीदरम्यान अंतिम निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. तर मराठा आरक्षण रद्द झाल्याने आता राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी स्वागत केले आहे. तसेच मराठा आरक्षण प्रकरणात जरी हत्या झाली तरी खुल्या गुवंतांसाठी लढाई सुरु राहणार असल्याचे याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. तसेच महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गुणवंत जे भीतीपोटी समोर येऊ शकत नाहीत अशा सर्वांनी मला पाठींबा दिला कुटुंबाला समर्थन दिले त्यांनाही शुभेच्छा देतो आहे. मराठा आरक्षणासाठी ५२ मोर्चे काढले, बीएमडब्लूमधून जमवलेले लाखो लोक, शरद पवारांच्या दिल्लीतील बैठका, संजय राऊत यांची एंट्री, फडणवीसांना वेठीस धरणे, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणणे याविरोधात खुल्या वर्गातील गुणवंतांची ही संविधानाची लढाई होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस जाहीर केले आहे. हे कोरोना व्हायरसप्रमाणे असून सर्वोच्च न्यायालयाने लस देऊन हे प्रकरण नेस्तनाबूत केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा खुल्या गुणवंतांचा विजय आहे तर ५२ मोर्चांचा पराभव आहे. राजकीय नेत्यांनी शरद पवारांनी असे करु तसे करु म्हटले परंतु सगळं पुढ्यात गेले आहे. अखेर संविधानाचा विजय झाला आहे. या निर्णयामुळे जर माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवितास काही झालं तर या सर्वाला सुप्रिया सुळे, शरद पवार, मराठा संघटना आणि मराठा आरक्षणासाठी आम्हाला धमक्या देणारे जबाबदार असतील असे याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

समाजातून दूर राहिलेले अशी मराठ्यांची परिस्थिती नाही. दडपशाही, राजेशाही, पाटीलकी,देशमुखी चालणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संविधनावार चालणारा देश आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने आज संविाधानाचा, सामान्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे या विजयाला कोणीही डिवचण्याचा प्रयत्न करु नका असा इशारा गुणरत्ने सदावर्ते यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्रात कोणालाच आरक्षण नको आहे फक्त दबावापोटी सर्व नेते होकार देत आहेत. अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गुणरत्ने सदावर्ते यांनी केली आहे.