घरमहाराष्ट्रमोदींनी माढ्यात स्वत:ची जात सांगितली, राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेत उत्तर दिलं!

मोदींनी माढ्यात स्वत:ची जात सांगितली, राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेत उत्तर दिलं!

Subscribe

देशात दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु असताना राज ठाकरेंनी मात्र मोदींविरोधातला आपला तोफखाना सुरूच ठेवला आहे. गुरुवारी पुण्याच्या खडकवासला मतदारसंघासाठी झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा परखड शब्दांमध्ये टीका केली. ‘मोदी गेली ५ वर्ष जगभर फिरतायत. तिथल्या राष्ट्राध्यक्षांना मिठ्या मारतायत. या मिठ्यांमधून काय मिळालं? किती पैसा मिळाला? जगभरातल्या संस्था सांगत आहेत भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच यावेळी मोदींनी माढ्याच्या सभेमध्ये केलेल्या त्यांच्या जातीच्या उल्लेखावरही राज ठाकरेंनी जोरदार टीका केली.

‘आता मोदी जातीवर बोलायला लागलेत’

‘मोदींना त्यांच्या आश्वासनांपेक्षाही प्रचार भलतीकडेच घेऊन जायचा आहे. त्यामुळेच माढ्याच्या सभेत त्यांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला’, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी मोदींच्या माढ्यातल्या सभेतली क्लिप दाखवली, ज्यात मोदी ‘विशिष्ट जातीचा असल्यामुळेच माझ्यावर टीका होते, मला हे सगळं सहन करावं लागलं’, असं म्हणत आहेत. यावेळी गेल्या ५ वर्षांत झालेल्या दलितांवरच्या अत्याचारांविषयी मोदी का बोलले नाहीत? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. तसेच, जनावरांचं कातडं सोलण्याचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना गुजरातमध्ये कशा प्रकारे जाहीररीत्या मारलं गेलं, याचा व्हिडिओही राज ठाकरेंनी दाखवला. उना प्रकरणाचा हा व्हिडिओ होता. ‘आत्ता जातीचा उल्लेख करणारे मोदी देशातली ५० ते ६० माणसं जेव्हा गोरक्षणाच्या नावाखाली मारली गेली, तेव्हा का नाही काही बोलले?’ असा प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

‘रामदेव बाबा अप्पर-डिप्पर मारत बसलाय’

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर देखील खोचक टीका केली. ‘काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांच्या नादाला लागून आख्ख्या देशाला यांनी योगा करायला लावला. इथे आख्खा देश गळ्यात तंगडं घालून बसलाय. आणि तो रामदेव बाबा तिथं अप्पर-डिप्पर मारत बसलाय. एका माणसाचा ५ वर्षांत ४ हजार कोटींचा व्यवसाय होतो कसा? भाजपनं इतक्या निवडणुका लढवल्या, त्यासाठीचे पैसे यांच्याकडे आले कुठून?’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी राज ठाकरेंनी २०१२पासून २०१६पर्यंत देशात दरवर्षी झालेल्या बलात्कारांची आकडेवारी सादर केली. त्यामध्ये मोदी सरकारच्या काळात देखील या प्रकरणांमध्ये अजिबात कमी झालेली नसल्याचं ते म्हणाले. ‘मोदी तुम्ही येऊन वेगळं काहीतरी घडवणार होतात ना? मग ते वेगळ काही का घडलं नाही?’ असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

- Advertisement -

‘वल्लभभाईंचा पुतळा चीनमधून का बनवलात?’

डोकलामच्या वेळी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची चर्चा केली जात असताना ‘वल्लभभाईंचा पुतळा चीनमधून का बनवून आणलात?’ असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. तसेच, ‘जिवंत माणसं जगवण्यासाठी पैसे नसताना हे पुतळ्यांसाठी ३-४ हजार कोटी खर्च करत आहेत. या देशाला पुतळ्यांची गरज आहे का? ही नाटकं करण्यासाठीच निवडून दिलं का मोदींना?’ असंही राज ठाकरे म्हणाले.

‘मराठीत शिव्या पटकन सुचतात’

यावेळी भाषणाची सुरुवात करताना राज ठाकरेंनी सभांचे व्हिडिओ उत्तर भारतात देखील चालत असल्याचं सांगितलं. तसंच उत्तर भारतात सुद्धा ४ सभा घ्यायचं आमंत्रण असल्याचं ते म्हणाले. ‘मी म्हटलं इथेच बरं आहे आपलं आपलं. कारण हिंदीत शिव्याही पटकन सुचत नाहीत. मराठीत शिव्या पटकन सुचतात’, असा टोमणा त्यांनी यावेळी लावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -