घरमहाराष्ट्रखातेवाटपाची यादी राजभवनावर

खातेवाटपाची यादी राजभवनावर

Subscribe

खातेवाटप नाहीच, व्हॉटस्अ‍ॅपवर फिरतायत याद्या

महाराष्ट्र विकास आघाडीच्या खातेवाटपाची कोंडी आता लवकरच फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपासंदर्भातील यादी राज्यपालांकडे पाठविली असून ही यादी आता अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत या यादीच्या मान्यतेची कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने शनिवारीही खातेवाटपाचा तिढा तसाच कायम राहिला. दरम्यान, खातेवाटपासंदर्भातील एक यादी शनिवारी व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही यादी शनिवारी अनेकांसाठी ब्रेकिंग न्यूज ठरताना दिसली. शनिवारी दिवसभर यादी जाहीर न झाल्याने अनेक आमदारांचा हिरमोड झाला. अनेकांनी आपल्या मर्जीतील मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरुच ठेवल्याचे दिसून आले आहे.

विशेष म्हणजे, शनिवारी खातेवाटपाची संभाव्य यादी जाहीर झाली असून या यादीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबरला पूर्ण झाल्यानंतर उभ्या महाराष्ट्राचे लक्ष हे खातेवाटपाकडे लागले आहे. दोन दिवसांत खातेवाटप जाहीर होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र सहा दिवस उलटले तरी अद्याप खातेवाटप जाहीर न झाल्याने मंत्रीपदाची शपथ घेऊन बसलेल्या अनेक मंत्र्यांचा शनिवारीदेखील हिरमोड झाला. तर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर पुन्हा एकदा खातेवाटपाचे वृत्ताबांबत अनेक तर्कविर्तकांना उधाण आले होते.

- Advertisement -

तर दुसरीकडे राज्य सरकारकडून काही नवी खाते निर्माण करण्यात येत असल्याने खातेवाटपास उशीर होत असल्याची खंत राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी व्यक्त केली. त्यामुळे खातेवाटप सोमवारी जाहीर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर शनिवारी संध्याकाळीच खातेवाटप जाहीर होतील, असे संकेत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळे सर्व मंत्री आणि आमदारांचे लक्ष पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहाबरोबरच राजभवनावर लागून राहिले होते. मात्र शनिवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून कोणतीही घोषणा न झाल्याने खातेवाटपाची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून आले आहे.

बैठकांचा फार्स सुरुच
दरम्यान, खातेवाटपाचा तिढा सोडविण्यासाठी शनिवारीदेखील महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांचा फार्स सुरु असल्याचे चित्र दिसून आले. शनिवारी दुपारी खातेवाटपासंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती. या बैठकीत खातेवाटपावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र खातेवाटपासंदर्भात संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलविली होती. या बैठकीनंतर मात्र त्यांनी कोणतीही घोषणा न केल्याने खातेवाटपाचे रखडगाणे सुरुच राहिले.

- Advertisement -

नवी संभाव्य यादीची चर्चा जोरात
गेल्या सहा दिवसांपासून खातेवाटपाच्या प्रतीक्षेत असलेल्या मंत्र्यांची संभाव्य यादी पुन्हा एकदा शनिवारी वार्‍यासारखी पसरली. यात प्रामुख्याने शिवसेनेचे अनिल परब यांना परिवहन मंत्री पद दिले जाईल. तर उदय सामंत यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग सोपविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. तर राष्ट्रवादीच्या यादीत राजेश टोपे यांना आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याशिवाय दिलीप वळसे पाटील यांना उत्पादन शुल्क व कौशल्य विकास या विभागाचा कार्यभार दिला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या यादीत नव्याने सुरु करण्यात येणार्‍या मंत्रालयाच्या कोणताही उल्लेख नव्हता.

शिवसेना

उद्धव ठाकरे- सामान्य प्रशासन, विधी खाते
एकनाथ शिंदे – नगरविकास, एमएसआरडीसी
सुभाष देसाई – उद्योग
उदय सामंत – उच्च तंत्र शिक्षण
आदित्य ठाकरे – पर्यटन, पर्यावरण
अनिल परब- परिवहन, संसदीय कामकाज
शंकरराव गडाख – मृदू जलसंधारण
संदिपान भुमरे – रोजगार हमी
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
दादा भुसे – कृषी
संजय राठोड – वनविभाग

काँग्रेस

बाळासाहेब थोरात – महसूल
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत – ऊर्जा
विजय वड्डेटीवार – ओबीसी,मदत-पुनर्वसन
के.सी.पाडवी – आदिवासी विकास
यशोमती ठाकूर – महिला व बालकल्याण
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक
सुनील केदार – दुग्ध विकास व पशुसंवर्धन
वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण
अस्लम शेख -वस्त्रोद्योग, मत्स्य आणि बंदर

राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार – वित्त आणि नियोजन
अनिल देशमुख – गृह
जयंत पाटील-जलसंपदा
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
दिलीप वळसेःउत्पादन शुल्क,कौशल्य विकास
बाळासाहेब पाटील – सहकार
राजेश टोपे- आरोग्य
जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
राजेंद्र शिंगणे – अन्न व औषध प्रशासन
हसन मुश्रीफ – ग्रामविकास
नवाब मलिक – अल्पसंख्यांक,कामगार

राज्य मंत्री

 शंभूराज देसाई – गृहराज्यमंत्री (ग्रामीण)
अब्दुल सत्तार – महसूल, ग्रामविकास
बच्चू कडू – जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्री
सतेज पाटील – गृह राज्यमंत्री (शहर)
विश्वजित कदम – कृषी आणि सहकार राज्यमंत्री
राजेंद्र यड्रावकर- आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री
अदिती तटकरे – उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री
दत्ता भरणे – जलसंधारण, सामान्य प्रशासन
संजय बनसोडे – पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -