घरताज्या घडामोडीमनसेत राजीनामा सत्र सुरुच, आणखी एका मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

मनसेत राजीनामा सत्र सुरुच, आणखी एका मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षातील अनेक मुस्लिम पदाधिकारी नाराज झाले आहेत. मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावेत अन्यथा त्याच मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्यात येईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. यानंतर पुण्यातील मनसे पदाधिकारी आणि नगरसेवक वसंत मोरे नाराज झाले होते. पुण्यातील काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर आता मनसे राज्य सचिव इरफान शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसेला धक्के बसत आहेत. राज ठाकरेंनी आपली भूमिका कायम ठेवल्यामुळे शेख यांनी राजीनामा दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याविरोधात घेतलेली भूमिका कायम ठेवली आहे. राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम राज ठाकरेंनी दिला आहे. परंतु या भूमिकेमुळे मुस्लिम पदाधिकारी नाराज झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर सभेत ३ मेनंतर मनसे आक्रमक भूमिका घेणार असल्याचे म्हटलं आहे. भूमिका कायम ठेवल्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र सुरु झालं आहे. मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी राजीनामा देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

इरफान शेख यांनी आपल्या मनसे राज्य सचिव पदाचा राजीनामा देत असे म्हटलं आहे की, माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर तोसुद्धा हतबल झाला असेल. जर एखादा आगरी समाजाचा नेता असेल आणि त्याने दि बा पाटलांच्या नावाला विरोध केला तर त्याला समाज जाब विचारणार नाही का? असा थेट सवालच खान यांनी उपस्थित केला आहे. तसेच ज्या कुटुंबातील व्यक्ती तुमच्यासोबत काम करण्याची प्रेरणा देत होते तेच आता तुमची साथ सोडण्याची सूचना करत आहेत. अनेक आंदोलनात केसेस अंगावर घेतल्या मार सहन केला त्याचे हे दिवस बघायला मिळत आहेत असे इरफान शेख यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

इरफान शेख राजीनामा पत्रात काय म्हणाले?

मी पक्ष स्थापनेपासून आपल्या सोबत कार्य करीत आहे. पक्षाच्या अनेक आंदोलनात सामील होऊन अनेक केसेस अंगावर घेतल्या. २००८ च्या मराठी पाट्यांचा आंदोलनात मला पोलिसांनी अटक करून संपूर्ण अंग हिरवे निळे करेपर्यंत मारहाण केली त्या वेळी आपणच मला म्हणाला होता की या जखमा विसरू नको, बाकी मी बघतो साहेब आता बघायला हे दिवस मिळाले एका बाजूने समाजात कुचंबणा दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण. माझ्या सारख्या आर्थिक परिस्थिती नसलेल्या कार्यकत्यांने आता कुठे आणि कोणाकडे भावना सांगाव्या? माझा राजीनामा मी खूप जड अंतकरणाने आपल्याला सोपवत आहे.

- Advertisement -

साहेब आज माझ्या कुटुंब आणि समाज यापुढे मी हतबल आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींनी मला आपल्या सोबत काम करण्याची प्रेरणा दिली तेच आज तुमची साथ सोडण्याची सूचना करत आहे. १६ वर्षात आजच आपल्याला अजान, मशीद, मदरसे यांच्यावर अचानक संशय आला. आम्ही तुमच्या सोबत असतांना तुम्ही आम्हाला का नाही या गोष्टी बोललात आम्ही याचा सोक्षमोक्ष आपल्या समोर केला असता.

साहेब आपण आपल्या बाजूने चुकला नसाल ही, पण आमच्या बाजूने अवश्य काही तरी भयंकर घडणार याचा प्रत्यय येत आहे. तरी आपण मी दिलेला राजीनामा स्वीकारावा. गेलेला काळ आणि आपले संबंध मी विसरू शकणार नाही परंतु येणाऱ्या काळात आपण काही तरी चांगले या देशासाठी आणि राज्यासाठी कराल ही सदिच्छा आणि भावना आहे असे इरफान शेख यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.


हेही वाचा : पवारांची समाजकारणातील अन् राजकारणातील भूमिका सगळ्यांना माहिती, दिलीप वळसे पाटलांचा फडणवीसांवर पलटवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -