घरमहाराष्ट्रमोदी विश्वव्यापी, फडणवीस सारथी तर आशिष शेलार अर्जुन; भाजपाच्या बैठकीत काय ठरलं?

मोदी विश्वव्यापी, फडणवीस सारथी तर आशिष शेलार अर्जुन; भाजपाच्या बैठकीत काय ठरलं?

Subscribe

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वव्यापी नेतृत्व, देवेंद्र फडणवीस यांचे रथाचे सारथ्य आणि आमदार आशिष शेलार यांच्यासारखा अर्जुन आपल्याकडे आहे त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी भाजप आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करुन विजयी होईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात पार पडली. या बैठकीला सकाळच्या पहिल्या सत्रात भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी मार्गदर्शन केले. आमदार अतुल भातखळकर यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. त्याला आमदार अमीत साटम यांनी अनुमोदन दिले. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, पुनम महाजन, मनोज कोटक यांच्यासह सर्व आमदार आणि मुंबई पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – नाहीतर पुन्हा एकदा संघर्ष होईल, नव्या राज्यपालांना राऊतांचा इशारा

बैठकीचा समारोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने झाला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे होते की त्यांच्या खिशाला पेन नाही. त्यांनी कधी कुठल्या पत्रावर शेरा मारला नाही आणि म्हणूनच त्यांना कंटाळून त्यांचे ४० आमदार गेले. उद्धव ठाकरे यांनी पत्रावर मारलेला शेरा दाखवा व एक हजार रुपये मिळवा असा उपरोधिक टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस हे असे नेतृत्व आहे की, प्रत्येक पत्रावर आदेश लिहून प्रशासनाला निर्देश देत राहतात. जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणारे नेतृत्व आपल्याकडे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात हजारो जन आज भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. आपली वाट पाहत आहेत. मोठे पक्ष प्रवेश आम्ही करु. पण प्रत्येक बुथवर किमान २५ पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांनी करा. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या किंचित सेनेचे पदाधिकारी तर त्यांना एवढे कंटाळले आहेत की ते आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे कामाला लागा. असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. प्रत्येक पदाधिका-यांनी २००० घरी प्रवास करणे अपेक्षित असून ५०० घरी धन्यवाद मोदी, ५०० घरांमध्ये फ्रेंडस ऑफ बीजेपी, ५०० युवा वॉरियर्स अशा स्वरुपात कामाला लागायचे आहे. येणारा काळ हा आपला आहे. वातावरण उत्तम, सक्षम नेतृत्व, निर्णय घेणारे केंद्रात आणि राज्यात सरकार यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

- Advertisement -

एक अकेला मुंबईमध्ये सगळ्यांना भारी पडणार – आ.अ‍ॅड.आशिष शेलार

हिंदुस्तान देख रहा है एक अकेला सबको भारी पड रहा है राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बाब अधोरेखित केली त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा एक मोदी सगळ्यांना भारी पडेल असा विश्वास व्यक्त करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अ‍ॅड.आशिष शेलार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना समजदारी, सहनशक्ती आणि सेवाकार्य वाढवा असे निर्देश दिले.
शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित, किंचित, माकपा, सपा हे सगळे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भितीने एकत्र आले असून भाजपासोबत होते तेव्हा सन्माननीय नेतृत्व शिवसेनेसोबत होते, मतदार होते आणि आमदारही होते. भाजपाशी गद्दारी केल्यापासून ना त्यांच्याकडे नेतृत्व आहे, ना मतदार आहेत, ना आमदार आहेत. आज मतांसांठी दारोदारी कटोरा घेऊन फिरावे लागते आहे. आपण जनतेच्या सेवेत असून मुंबईकर हे पाहत आहेत. देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह मुंबईत आले त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेसह एनडीएचे १५० नगरसेवक मुंबई महापालिकेत विजयी होतील आणि भाजपाचाच महापौर होईल. हा जो संकल्प सोडला आहे तो आपल्याला सर्वांना पूर्ण करायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला कामाला लागायचे आहे असे कार्यकर्त्यांना आवाहन करताना आमदार आशिष शेलार यांनी गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने पूर्ण केलेले एक काम दाखवा असे सांगत जोरदार हल्लाबोल केला.
गुजरातच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, हा विजय आपल्या विरोधकांना पचणार नाही. अन्याय वाढतील त्यामध्ये पक्षाचे नेतृत्वही असेल व कार्यकर्ताही. याला एकच उत्तर आहे. समजदारी, सहनशक्ती आणि सेवाकार्य आपण करत राहायचे आहे. हाच संदेश घेऊन मुंबईमध्ये आपण सर्वांनी काम करु या. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे कणखर नेतृत्व आपल्याकडे आहे त्यामुळे आपण जोमाने कामाला लागु. असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

दिपा पाटील यांचा पक्ष प्रवेश

वॉर्ड क्र. १ दहिसर येथील शिवसेना (उबाठा) महिला उपविभाग अध्यक्ष यांच्यासह शाखाप्रमुख गणेश पाटील व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने आज भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -