ST Workers Strike : स्वारगेट पाठोपाठ पंढरपूर आगारातून पहिली एसटी बाहेर; अनिल परबांच्या लॉबिंगला यश

पंढरपुरातील एसटी कर्मचाऱ्यांशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केल्यानंतर काही एसटी कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे

ST Workers Strike msrtc action against staff protesters st ran swargate agra untrained private driver and 25 buses running in pandharpur
ST Workers Strike : स्वारगेट पाठोपाठ पंढरपूर आगारातून पहिली एसटी बाहेर; अनिल परबांच्या लॉबिंगला यश

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगार वाढीची घोषणा केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले, मात्र अद्यापही काही ठिकाणी आंदोलन सुरुच आहे. अशातच महामंडळाने आता आंदोलक कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाने जवळपास 55 हजार संपकरी कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एसटी महामंडळाने नागरिकांना गैरसोय टाळण्यासाठी आणि पुन्हा एकदा एसटीची वाहतूक सुरळीत करण्यास हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अशातच लालपरी पुन्हा रस्त्यावर धावण्यासाठी परिवहन मंत्री स्वत: मैदानात उतरले आहेत. आज सोलापूर दौऱ्यावर असताना अनिल परब यांनी पंढरपूर आगारातील काही संपकरी कर्मचाऱ्यांची समजूत काढत 25 एसटी बसेस रस्त्यावर धावण्यास तयार केल्या आहेत. तर दुसरीकडे पुण्यात स्वारगेट आगारातूनही खासगी चालकांच्या मदतीने एसटी बसेस डेपोबाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंत्री अनिल परब यांच्या लॉबिंगला यश मिळत असल्याचे म्हणता येईल.

पंढरपुरातील एसटी कर्मचाऱ्यांशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केल्यानंतर काही एसटी कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे. त्यामुळे पंढरपूर आगारातून थोड्याच वेळात २५ एसटी बसेस धावण्यास सुरुवात होणार आहे. मंत्री अनिल परब आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेतले. याचवेळी शिवसेनेचे संपर्क नेते आ तानाजी सावंत यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता काही कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यास होकार दर्शवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी आणि भाविकांना दिलासा मिळाला आहे.

त्याचवेळी पुण्यातील स्वारगेट आगारातून अखेर आज लालपरी रस्त्यावर धावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यास नकार दिल्याने महामंडळाने करार तत्वावरील खासगी चालकांच्या मदतीने एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज स्वारगेट आगारातून पहिली एसटी बाहेर पडली. मात्र यावेळी आंदोलक कर्मचारी आणि महामंडळ अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आक्रमक आंदोलक कर्मचाऱ्यांनी आगारातून बाहेर पडत असलेली एसटी अडवत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही कर्मचाऱ्यांनी आगारातच ठिय्या आंदोलन करत सरकाविरोधात घोषणाबाजी केली. बाहेरचे चालक आणवून एसटी गाड्या बाहेर काढल्या जात असल्याचा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. मात्र यातून एसटी महामंडळ संपकरी कर्मचाऱ्यांना कोंडीत पकडत एसटी सेवा रुळावर आणत असल्याचे दिसून येतेय.


PPF Account मधून पूर्ण पैसे काढायचे आहेत? फॉलो करा ‘हे’ नियम