घरमहाराष्ट्रपालक हयात असेपर्यंत संपत्तीवर हक्क नाही

पालक हयात असेपर्यंत संपत्तीवर हक्क नाही

Subscribe

मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

आई-वडील हयात असेपर्यंत मुलांना त्यांच्या संपत्तीवर कोणताही हक्क सांगता येऊ शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने नुकताच एका प्रकरणात दिला आहे. मुलाचा विरोध फेटाळून लावत हायकोर्टाने वडिलांच्या नावावरील अंधेरीतील सदनिका विकण्यास आईला परवानगी दिली.

याचिकाकर्त्या सोनिया खान यांचे पती फझल खान यांच्या नावे अंधेरीतील मरोळ येथे एक सदनिका आहे. फझल खान हे स्मृतीभ्रंश व पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळलेले असून त्यांचे औषधोपचार व देखभालीसाठी पैसे कमी पडू लागल्याने फझल यांची मालमत्ता व बँक खात्याचे पालक म्हणून कायदेशीरदृष्ठ्या घोषित करावे, अशा विनंतीची याचिका सोनिया यांनी केली आहे. या याचिकेला त्यांचा मुलगा आसिफने विरोध केला होता.

- Advertisement -

मरोळमधील सदनिका हे सामायिक घर असल्याने त्यावर माझाही हक्क आहे. त्यामुळे ही सदनिका आईला विकता येणार नाही, असा दावा आई-वडिलांपासून स्वतंत्र रहात असलेल्या आसिफने केला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत न्या. गौतम पटेल व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने आसिफचा अर्ज फेटाळून लावला आणि सोनिया यांना पतीच्या नावे असलेली सदनिका विकण्याची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली.

आसिफ त्यांचा मुलगा आहे, या वस्तुस्थितीने आई-वडिलांच्या नावे असलेले कोणतेही घर हे सामायिक घर होत नाही.आई-वडील जिवंत असेपर्यंत मुलगा मालमत्तांवर हक्क सांगू शकत नाही. शिवाय वडिलांची काळजी घेतली, असेही अर्जदाराने पुराव्यांसह दाखवलेले नाही, असे निरीक्षण खंडपीठाने आपल्या निर्णयात नोंदवले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -