घरताज्या घडामोडीEV charging Station: मुंबई - पुणे, मुंबई - नागपूर महामार्गावर सुपरफास्ट चार्जिंगची...

EV charging Station: मुंबई – पुणे, मुंबई – नागपूर महामार्गावर सुपरफास्ट चार्जिंगची सुविधा मिळणार

Subscribe

मुंबई पुणे एक्सप्रेस हाययेवर येत्या दिवसांमध्ये इलेक्ट्रिक कार चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. महाप्रितच्या माध्यमातून एकुण ४ चार्जिंग स्टेशन हे टोल प्लाझाच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. तर मुंबई ते नागपूर या मार्गावर प्रत्येक २५ किलोमीटरला एक यानुसार एकुण ७० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी स्पष्ट केले. याठिकाणी सुपरफास्ट अशा स्वरूपाचे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. मुंबई आयोजित एका परिसंवादाच्या निमित्ताने श्रीमाळी यांनी ही माहिती दिली. येत्या काळात मुंबईतही मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन उभारणीचा आमचा मानस आहे. त्यासाठीच आम्ही हाऊसिंग सोसायटी, मॉल्स, मुंबई महापालिका तसेच शासकीय आस्थापनांशी संवाद साधला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई ते नाशिक, धुळे, भुसावळ, अकोला, नागपूर या टप्प्यातही प्रत्येक २५ किलोमीटरला चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्याची महाप्रितने योजना आखली आहे. याठिकाणी कारपासून ते मल्टी एक्सेल अशा प्रकारच्या वाहनांना चार्जिंग करता येणे शक्य होणार आहे. टोल प्लाझाच्या ठिकाणी अवघ्या १५ मिनिटात कार चार्ज करणारे हे सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन असतील अशी माहिती त्यांनी दिली. येत्या काळात हायड्रोजच्या तंत्रज्ञानावर आधारीत इंधन उपलब्ध करून देणे तसेच बायो फ्युएल देण्याचाही आमचा प्रयत्न असणार आहे. त्याअनुषंगानेच आम्ही राज्यातील काही महापालिकांसोबत करार करत असल्याचे श्रीमाळी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुंबईत १३५ चार्जिंग स्टेशनची सुविधा

मुंबईत प्रामुख्याने हाऊसिंग सोसायटीच्या मदतीने चार्जिंग स्टेशनची कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा मानस आहे. वाहन चालकांना रस्त्याच्या नजीक कनेक्टिव्हिटी आणि चार्जिंगची सुविधा मिळेल अशा ठिकाणांची निवड यासाठी करण्यात येईल. काही स्टेशनसाठीची भांडवली गुंतवणूक आम्ही करणार आहोत. त्यासाठी सबसिडीही देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील ७० ते ८० रहिवासी सोसायटीने आमच्याकडे अशी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. तर शासकीय आस्थापनांपैकी बीएसएनएल, एमआयडीसीने यासाठीचा पुढाकार घेतला आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये ही स्टेशन उभारण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. एक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी ५० लाख रूपयांचा खर्च येतो. सुरूवातीच्या काळात चार्जिंग स्टेशनसाठी लोकांना विश्वास वाटावा यासाठीचा हा पुढाकार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत पार्किंग प्लाझा, लग्नाचे हॉल, मॉल्स याठिकाणीही चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा मानस असल्याचे श्रीमाळी यांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -