मुंबईतल्या टॅक्सी चालकांची आमदारांनाही मुजोरी, स्वतंत्र टॅक्सी स्टॅण्डसाठी आमदार आक्रमक

विधिमंडळाच्या अधिवेशासाठी राज्यभरातून आमदार मुंबई आणि नागपुरात येतात. मात्र त्यांना टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा दादागिरी आणि मुजोरीचा सामना करावा लागतो. तसेच आमदारांना टॅक्सी, रिक्षा उपलब्ध होत नसल्यामुळे २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीएसएमटी आणि नागपूर रेल्वे स्थानकांबाहेर आमदारांसाठी स्वंतत्र टॅक्सी, रिक्षा स्टॅण्डची मागणी केली होती. तसेच टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या तक्रारीसुध्दा केल्या होत्या. त्यावर तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी उपायोजना करण्याचे निर्देश दिले होते.मात्र परिवहन विभागाकडून स्वंतत्र टॅक्सी स्टॅण्डची गरज नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

परिवहन विभागाने मागणी नाकारली

शहरातील टॅक्सी-रिक्षा चालकांची दादागिरी आणि मुजोरी सर्वसामान्य मुंबईकरांना अनुभवायाला मिळते. पण तुमच्या आमच्या सारखाच अनुभव जेव्हा राज्यातील आमदारांना येतो, तेव्हा हा प्रश्न थेट विधिमंडळात चर्चला येतो. त्यानंतर उपायोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांकडून दिले जातात. मात्र त्यानंतरही आमदारांच्या या समस्येचे  समाधान होताना दिसून येत नाही. २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रकाश गजभिये, आनंद ठाकूर आणि विद्या चव्हाण यांनी मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांबद्दल तक्रारी केलेल्या होत्या. तर आमदार प्रकाश गजभिये यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला सांगितले की, सीएसएमटी रेल्वे स्थानकांबाहेर आमदारांसाठी स्वंतत्र टॅक्सी स्टॅण्डची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि आताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात केली होती. कारण आमदारांना टॅक्सी आणि रिक्षा पकडण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागते. तसेच टॅक्सी आणि रिक्षा चालक आमचे ऐकत नाहीत. रेल्वे स्थानकांवर पोलीससुध्दा नसतात. त्यामुळे आमदारांसाठी टॅक्सी स्टॅण्डची मागणी आम्ही केली होती. त्यावर आश्वासनसुध्दा देण्यात आले होते.

स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करावी

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आमदारांसाठी स्वंतत्र टॅक्सी स्टॅण्ड उभारण्याकरीता परिवहन विभागाच्यावतीने सीएसएमटी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. त्यानंतर आपला अहवाल मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाला (एमएमआरटीए) देण्यात आलेला आहे. ज्यात सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर अधिकृत चार ठिकाणी शेअर टॅक्सी स्टॅण्ड उपलब्ध आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने स्वतंत्र टॅक्सी स्टॅण्ड उभारणे अपेक्षित नसून वाहतूक विभागाने स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करावी, असं अहवालात म्हटले आहे. यासंबंधी आम्ही परिवहन आयुक्तांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, यासंबंधी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण निर्णय घेतला आहे. त्यांचं पत्र तुम्हाला मी पाठवतो.

हा निर्णय फार चुकीचा आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आम्हाला टॅक्सी पकडण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागते. टॅक्सी चालकांची दादागिरी आणि मुजोरी प्रंचड वाढली आहे. तिथे कायमस्वरुपी पोलीस चौकी  आणि  पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकरी असणे फार गरजेचे आहे. तसेच आमदांरासाठी स्वतंत्र टॅक्सी स्टॅण्ड उभारण्यासाठी आम्ही पाठ पुरावा करतो आहे.
– प्रकाश गजभिये,आमदार