घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहापालिकेची नोटीस बेकायदेशीर, ती जागा ट्रस्टच्याच मालकीची; नवश्या गणपती मंदिराशेजारील दर्गा ट्रस्टचा...

महापालिकेची नोटीस बेकायदेशीर, ती जागा ट्रस्टच्याच मालकीची; नवश्या गणपती मंदिराशेजारील दर्गा ट्रस्टचा आंदोलनाचा इशारा

Subscribe

नाशिक : हिंदू हुंकार सभेने आनंदवल्ली येथील नवश्या गणपती मंदिरा शेजारील दर्ग्याच्या बांधकामाचा मुददा उपस्थित केला आहे. यानंतर महापालिका प्रशासनाने दर्ग्याला नोटीस पाठवली असून सात दिवसात खुलासा करण्याचे या नोटीसीत म्हटले आहे. त्यानूसार मगळवारी दर्गाह ट्रस्टसह माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी कागदपत्र सादर करत ती सर्व जागा दर्गाहच्या मालकीची असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ट्रस्टला बजावलेली नोटीस बेकायदेशीर असून ही नोटीस मागे घेउन सामाजिक सलोखा राखावा अन्यथा रस्त्यावर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशाराही यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला.

मुंबई, सांगली पाठोपाठ नाशिकमधील दर्ग्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू हुंकार सभेत सुरेश चव्हाणके यांनी शहरातील अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली होती. गंगापूर रोडवरील प्रसिध्द नवश्या गणपतीला लागूनच असलेल्या दर्ग्याचे अतिक्रमण हटविण्याबाबत सरकारला इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित ट्रस्टला नोटीस बजावली व याबाबत सात दिवसांत आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली. मंगळवारी माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्यासह ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले.

- Advertisement -

या निवेदनात म्हटले आहे की, आनंदवल्ली शिवारातील सर्व्हे नं. ६५/२ क्षेत्रफळ १७०० चौ.मी. असून मालकी हजरत पीर सैय्यद रांझे शाह दर्गाह जहागिर मस्जिद (वक्फ बोर्ड) यांची असून त्यामध्ये जागा मालकाने सन १९४० साली बक्षिस पत्र दिलेले आहे. सदरची जागा ही गावठाण मध्ये येत असून त्या ठिकाणी महानगर पालिकेने ट्रस्टच्या जागेमधून २४ मीटर रस्ता प्रस्तावित केलेला आहे. मात्र जागा खाजगी मालकीची असल्याने भूसंपादन करुन मनपाला जागा ताब्यात दयावी लागेल, त्यामुळे महापालिकेने बजावलेली नोटीस बेकायदेशीर आहे. भूसंपादन प्रस्ताव मंजूर करुन ट्रस्टला पैसे देत नाही, तोपर्यंत अतिक्रमणाची नोटीस बजावणे कायदेशीर नाही. दर्गामध्ये जे काही बांधकाम आहे ते एमआरटीपी अ‍ॅक्ट तयार होण्यापुर्वीचे आहे. तरी नोटीसीत उल्लेख असलेले पत्र्याचे शेड गरज नसतांना आम्ही स्वतःहून आपला सन्मान ठेवून स्वमर्जीने काढून घेतले आहे. त्यामुळे आपण बजाविलेली नोटीस बेकायदेशीरच आहे. ती त्वरीत मागे घ्यावी अन्यथा नागरीक रस्त्यावर उतरण्या शिवाय पर्याय नाही असे म्हंटले आहे.

तसेच नवश्या गणपती मंदिराकडे जाण्याचा रस्ता हा सुध्दा ट्रस्टच्या मालकीचा आहे, त्याचा सुध्दा आम्ही कुठलाही मोबदला घेतलेला नाही. परंतु सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी आम्ही सर्व गणेश भक्तांना उपलब्ध करुन दिलेला आहे. तरी सामाजिक सलोखा टिकवण्याची जबाबदारी महापालिकेची सुध्दा आहे, भावना भडकवण्याची नाही, कृपया त्वरीत नोटीस रद्द करावी,असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सोहेल बेग,सय्यद अय्युब,अन्सार पाठकरी,मतिन मन्सुरी,सलिम हाजी, जाकीर अत्तार, बब्बु हजारी आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -