घरताज्या घडामोडीसावंतवाडीमध्ये दोन वृद्ध महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला

सावंतवाडीमध्ये दोन वृद्ध महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला

Subscribe

सावंतवाडी उभा बाजार परिसरात दोन वृध्द महिलांच्या खुनाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. निलिमा नारायण खानविलकर (वय ८०) आणि शालिनी शांताराम सावंत (वय ७५) अशी त्या दोघांची नावे आहेत. एखाद्या धारदार शस्त्राने अज्ञाताने त्यांच्यावर हल्ला केला आहे. घटनास्थळी रक्ताने माखलेल्या एका पायाचा ठसा दिसून आला असून पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे. चोरीच्या उद्देशाने किंवा मालमत्तेच्या वादातून हा खून झाला असावा असा अंदाज पोलीस निरीक्षक शंकर कोरे व्यक्त केला असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद करीत आहेत.

दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार निलिमा खानविलकर या त्यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. तर मृत शालिनी सावंत या निलिमा खानविलकर यांच्याकडे केअरटेकर म्हणून काम करत होत्या. आपल्या नातेवाईक असल्यामुळे मसुरकर हे नेहमी खानविलकर यांची विचारपूस करण्यासाठी जायचे. नेहमीप्रमाणे आज सकाळी ही त्यांना घरी टीव्ही लावून देण्यासाठी ते गेले असता हाक मारल्या नंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ते थेट घरात गेले त्यावेळी त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. हा सर्व प्रकार पाहून त्यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याला फोन करून दिली.

- Advertisement -

हा प्रकार अज्ञात चोरट्याकडून झाला असावा, त्यांच्या गळ्यात सोन्याच्या चैन होत्या. त्यामुळे सोन्यासाठी त्यांचा खून झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती त्यांच्या भाच्याला दिल्या नंतर तो या ठिकाणी यायला निघाला आहे. याबाबत तपास अधिकारी तौसिफ सय्यद यांना विचारले असता म्हणाले की, दोघांवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. दोघे रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडून आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. मात्र नेमका खून का झाला याबाबत तपास करण्यात येणार आहे. तर अधिक तपासासाठी फॉरेन्सिक एक्सपर्टना बोलविण्यात आले असून श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या तपास सुरू आहे.

सावंतवाडी बाजार येथील निलिमा नारायण खानविलकर (८०) आणि शालिनी शांताराम सावंत (७५) या दोन वृद्ध महिलांचा त्यांच्या राहत्या घरी निर्घुण खून झाल्याची घटना निदर्शनास आल्यानंतर या दुहेरी हत्याकांडामुळे सावंतवाडी शहरात एकच खळबळ उडाली. सावंतवाडी पोलिसांसमोर या खूनाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर ओरोस येथून श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून रॅम्बो नामक श्वानाच्या मदतीने तपास घेण्याचे काम सुरू आहे.
तपास सुरू असताना रेम्बो घटनास्थळावरून सुरुवातीला पांजरवाडा मार्गे माठेवाडा आत्मेश्वर मंदिर आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून पुन्हा घटनास्थळाकडे आला आणि तेथेच घुटमळला.

- Advertisement -

या श्वानपथकात अमित वेंगुर्लेकर, जयप्रकाश जाधव आणि निखिल चव्हाण यांचा सहभाग असून सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे तपासी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद व अन्य पोलीस कर्मचारीही तपास कार्यात सहभागी झाले आहेत. दरम्यान, मृत निलिमा नारायण खानविलकर यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी आपली प्रॉपर्टी त्यांच्या भाच्याच्या नावाने केली असल्याची माहिती राजू मसुरकर यांनी पोलिसांना दिली आहे. त्यांच्या या प्रॉपर्टीत बिल्डर करवी डेव्हलपमेंट केली जाणार होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रॉपर्टीच्या वादातून हे दुहेरी हत्याकांड झाले असावे असा अंदाज पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, तपासा नंतरच खरे सत्य बाहेर येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर खूनी लवकरच जेरबंद होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -