हत्या की आत्महत्या?; पत्नी व मुलावर चाकूहल्ला करताना उद्योजकाचाच मृत्यू

नाशिक : येथील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणार्‍या अश्विननगरमध्ये ५७ वर्षीय उद्योजकाने आपल्या पत्नी व १८ वर्षीय मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत त्यांचाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१६) सकाळी घडली. उद्योजकाचा मृत्यूमुळे नवीन नाशिकमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात देव कौशिक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष कौशिक (वय ५७) असे मृत्यू झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व देव कौशिक यांच्या फिर्यादीनुसार, आशिष कौशिक हे पत्नी ज्योती (वय ५४) व मुलगा देव (वय १८) यांच्यासमवेत अश्विननगरमधील शिव बंगल्यात राहत होते. गुरुवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान देव आपल्या खोलीत झोपलेला असताना त्याच्या उजव्या हातावर हत्याराने वार झाल्याने तो जागा झाला. त्यावेळी त्याला वडील आशिष यांच्या हातात चाकू दिसला व ते त्याच्यावर वार करण्याच्या प्रयत्नात होते. तितक्यात देव याने तेथून पळ काढला व आपल्या आईच्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद केला. त्यावेळी त्याला आई ज्योती पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ही बाब त्याने तात्काळ अनिल नेगी, वडिलांचे मित्र नारायण विंचूरकर व श्रीरंग सारडा यांना मोबाईलवर कॉल करुन सांगितली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना आशिष कौशिक जमिनीवर पडलेले दिसले. त्यांनी देव व ज्योती यांना औषधोपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये केले. तर आशिष कौशिक यांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

देव याच्या उजव्या हाताला जखम झाली असून वडील आशिष कौशिक यांनीच आपल्या आईवर तसेच आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार त्याने दाखल केली आहे. दरम्यान, आशिष कौशिक यांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासात आशिष कौशिक यांच्यावर रक्तदाब, मधुमेह, नकारात्मक विचार करण्याच्या आजारावर उपचार सुरू असल्याचे उघड झाले आहे. तर ज्योती यांच्यावरही मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या आजाराचे उपचार सुरू होते. दरम्यान पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

कौशिकांच्या मृत्यूच वाढले गूढ

आशिष कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त केला जात आहे. त्यांनी पत्नी ज्योती व मुलगा देव यांच्यावर हल्ला केला तर या घटनेत त्यांचाच मृत्यू कसा झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, ही घटना मानसिक तणावातून झाली की कौटुंबिक वादातून झाली, व्यावसायिक स्पर्धेतून त्यांची हत्या करण्यात आली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.