घरक्राइमनिकालाच्या आदल्याच दिवशी खून; जाणून घ्या काय आहे प्रकरण

निकालाच्या आदल्याच दिवशी खून; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Subscribe

इंदिरानगर :  परिसरात वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील कैलासनगरात पाच मजली इमारतीच्या गच्चीवरून ढकलून दिल्याने १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञांत दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. विद्या हनुमान काळे (१६, मूळ रा. सारोळा, ता. पाथरी, जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान काळे हे पत्नी सविता व बारावीतील मुलगा ओम व विद्यासह राहतात. ते पत्नीसोबत बुधवारी (दि.३१) सायंकाळी भाजीपाला घेण्यासाठी लेखानगरला गेले होते. तर, ओम ओझरला गेलेला होता. हे सर्व रात्री आठ वाजेच्या सुमारास घरी परतले. घराच्या अंगणात येताच त्यांच्या डोळ्यांसमोर विद्या इमारतीवरून खाली कोसळली. यात ती गंभीर जखमी झाली. हे दृश्य पाहून तिच्या आई-वडिलांच्या हृदयाचा ठोका चुकला. आईने हंबरडा फोडत नागरिकांना मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. शेजारच्यांच्या मदतीने विद्याला लेखानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळ ती बोलण्यात होती. यावेळी आई-वडिलांनी तिला नेमके काय झाले, असे विचारले असता दोघांनी तिला इमारतीच्या गच्चीवर नेले. त्यापैकी एक ओळखीचा होता. त्याने धक्का देऊन खाली ढकलून दिल्याचे तिने सांगितले, असे तिच्या आई-वडिलांनी पोलिसांनाही सांगितले. बुधवारी रात्रभर तिने मृत्यूशी झुंज दिली. मात्र, गुरुवारी (दि.१) दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

- Advertisement -

वरिष्ठ पोलीस अधिकारी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. दरम्यान, विद्याच्या अंगावरील जखमा पाहता व तिने तिच्या पालकांना दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, शांतताप्रिय म्हणून ओळखल्या जाणार्‍या विद्याच्या खूनाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

काळे कुटुंबियांवर पसरली शोककळा

विद्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. ती निकालाची वाट पाहत होती. मात्र, निकालाच्या आदल्या दिवशीच तिचा मृत्यू झाल्याने काळे कुटुंबावर शोककळा पसरली. दहावीच्या परीक्षेत तिला 59 टक्के गुम मिळाले आहेत. त्यामुळे इंदिरानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -