घरताज्या घडामोडीगोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता 'बाळासाहेब ठाकरे' नावाने ओळखलं जाणार

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे’ नावाने ओळखलं जाणार

Subscribe

जवळपास 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान उभारण्यात आले आहे. गोरेवाडा हे ठिकाण फक्त 6 किलोमीटरवर आहे.

नागपुर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण “बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपुर” असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली . नागपुर जवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येणार आहे. या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपुर यांच्या अखत्यारीत असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे. जवळपास 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान उभारण्यात आले आहे. गोरेवाडा हे ठिकाण फक्त 6 किलोमीटरवर आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी भारतीय सफारीचे उद्घाटन

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे वैविध्यपूर्ण असून त्यामधील भारतीय सफारीचे काम पूर्ण झाले आहे. ही सफारी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारी करण्यासाठी प्राण्यांचे स्थलांतरण सुध्दा करण्यात आलेले आहे. भारतीय सफारीचे उद्घाटन झाल्यानंतर 40 आसन क्षमतेची 3 विशेष वाहने व ऑनलाईन तिकिट बुकींग सुविधा जनतेसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

भविष्यात हे एक महत्वाचे व मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा शासनाचा मानस आहे. हा सदर प्रकल्प नागपूर शहरास लागून असल्याने या प्रकल्पामुळे या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी सुध्दा उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, संशोधन व शिक्षण तसेच वन्यजीवांचे पुनर्वसन याबाबतचे कामही या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात केले जाणार आहे. प्राणी उद्यानात ये-जा करणाऱ्या पर्यटकांकरीता पार्किंग, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, वाहने इत्यादी सुविधा करण्यात आलेल्या आहेत अशी माहितीही वन मंत्री संजय राठोड यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -