रिक्षा-ट्रक अपघातात ५ ठार, अंत्यविधीसाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला

Nashik lasalgaon road accident 5 killed in rickshaw-truck accident

लासलगाव-विंचूर रोडवरील मंजुळा पॅलेस समोर अॅपपे रिक्षा आणि हायवा यांच्यामध्ये झालेल्या जोरदार धडकेत रिक्षामधील पाच जण ठार झाल्याची घटना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत लासलगावी अंत्यविधीसाठी लोणी, ता. राहता येथील दोन जणांचा समावेश आहे मृतांमध्ये पाचही पुरुषांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. २५) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लासलगाव येथून विंचूरच्या दिशेने निघालेली अॅचपे रिक्षा क्र. एमएच १५-वाय ४४६१ मध्ये रिक्षा चालकासह पाच जण प्रवास करत असताना विंचूरहून लासलगावच्या दिशेने निघालेल्या हायवाने जोरदार धडक दिल्याने जागेवरच पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लासलगावमध्ये घडलेली आहे.

मृतांमध्ये सुहास मनोहर निकाळे (वय ४०, विंचूर, रिक्षा चालक), विठ्ठल बाजीराव भापकर (वय 65, लोणी प्रवरा), भाऊसाहेब बाळासाहेब नागरे (वय ६०, लोणी प्रवरा), किसनदास बैरागी (वय ६०, धारणगाव खडक), रतन पवार (वय ४०, इंदिरानगर, विंचूर) यांचा समावेश आहे. यातील दोन प्रवाशी लोणी प्रवरा येथून लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे भाऊसाहेब पठारे यांचेकडे अंत्यविधीसाठी सकाळी आले होते.

अंत्यविधी कार्यक्रम आटोपून आपल्या गावी जाण्यासाठी ते विंचूरला रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघाताचे वृत्त समजताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ हे आपल्या सहकार्यांजसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त पाचही जणांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित घोंगडे यांनी तपासणी केली असता चार जण मृतावस्थेत आढळून आले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच लासलगावचे डॉक्टर सुजित गुंजाळ आणि डॉक्टर विलास कांगणे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत उपचारासाठी मदत केली.


हेही वाचा : धक्कादायक : चेंबूर मध्ये शस्त्राचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार