वर्षभरात रस्ते अपघातांत १७७ बळी

वाहनचालकांची बेशिस्ती, वाहतुकीची कोंडी आणि ओबडधोबड मार्ग यामुळे रस्ते अपघातांत मृत्यू होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत रस्ते अपघात तब्बल 177 वाहनचालकांचे बळी गेले आहेत. शहरात दर दोन दिवसांत एका वाहनचालकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत असल्याचे भीषण वास्तव दैनिक ‘आपलं महानगर’च्या पाहणीत समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरात महामार्गनिहाय एकूण ५53 रस्ते अपघात झाले असून राष्ट्रीय महामार्गावर 59, राज्य महामार्गावर 9 व इतर मार्गांवर १19 जण मृत्यूमुखी पडले आहेत. सर्वाधिक अपघात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेदरम्यान झाले आहेत.

Accident
अपघात

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, बेशिस्त वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करत हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करावा, यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे वर्षभर हेल्मेट ड्राईव्ह कारवाई करण्यात आली. मात्र, त्याचा फारसा फरक वाहनचालकांवर पडलेला नसल्याचे अपघातांच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. सन २०१५ ते २०१८ या काळात रस्ते अपघात तब्बल ८३५ वाहनचालकांचे बळी गेले आहेत. तर २०१९ मध्ये तब्बल १७७ जणांचा बळी गेला आहे. शहर वाहतूक शाखेने शहरातील अपघाताचे २० ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) जाहीर केले आहेत. तरीही वाहनचालक वेगावर नियंत्रण मिळवत नसल्याने अपघातात बळी जात आहेत. वर्षभरात वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण न मिळवल्याने व वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने सर्वाधिक अपघात सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेदरम्यान झाले आहेत.

दृष्टिक्षेपात

* जानेवारी ते डिसेंबरमधील फेटल अपघात 169

* अपघातात मृत झालेल्यांची संख्या 177

* राष्ट्रीय महामार्ग अपघाती मृतांची संख्या 59

* राज्य महामार्ग अपघाती मृतांची संख्या 9

* इतर रस्ते अपघाती मृतांची संख्या 119

२०१९ मध्ये अपघातांत घट 

२०१८ मध्ये २०९ फेटल अपघात झाले असून २१७ जणांचा बळी गेला होता. तर २०१९ मध्ये १६९ फेटल अपघात झाले असून, १७७ जणांचा बळी गेला आहे. २०१८ मध्ये वर्षभर सातत्याने हेल्मेट ड्राईव्ह राबवण्यात आल्याने अपघातांत घट झाली आहे. वर्षभरात सर्वाधिक अपघात विनाहेल्मेट व विनासीटबेल्ट वाहन चालवल्याने झाले आहेत.

पौर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त