घरमहाराष्ट्रनाशिक२५ वर्षात ३२५ वेळा कळसुबाई शिखर सर

२५ वर्षात ३२५ वेळा कळसुबाई शिखर सर

Subscribe

घोटीतील युवकांचा अनोखा विक्रम; पहाटे चार वाजेला देवीच्या दर्शनाची लागती ओढ

इगतपुरी : तालुक्यातील कळसुबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी गेल्या २५ वर्षांपासून नवरात्रोत्सवात कळसुबाईच्या शिखरावर अखंडितपणे जाण्याचा निर्धार कायम ठेवला. उल्लेखनीय बाब म्हणजे २५ वर्षात नवरात्रोत्सवाबरोबरच इतर कारणांमुळेही शिखरावर जात आजपर्यंत २५ वर्षात ३२५ वेळा कळसुबाईच्या शिखरावर जाण्याचा विक्रम कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली १५० युवकांनी विक्रम केला आहे.

महाराष्ट्रातील नव्हेतर देशातील हा पहिलाच विक्रम ठरावा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शरीराची साथ व देवीचा आशीर्वाद व सकारात्मक साथ हा त्रिवेणी संगम कायम राहिला तर हा विक्रम पुढेही कायम सुरु राहील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी दिली. जणू काही कळसुबाई व घोटीचे ट्रेकिंगवीर हे एक सुत्रच झाले आहे. १९९७ मध्ये घोटी येथील भागीरथ मराडे व त्यांच्या दोन मित्रांनी चालू केलेली परंपरा यांचा आदर्श घेत जवळपास मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात १५० ते २०० युवक या कार्यात सहभागी झाले आहेत. या अगोदर हा उपक्रम कोणीही केलेला नसून या युवकांच्या कार्याची दखल बाबासाहेब पुरंदरे, राजसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेत त्यांच्या वतीने मातेच्या चरणी घटीकाचे पूजन करून अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्याकडे नवरात्रीची घटिका सुपूर्द केले. या अनोख्या व कौतुकास्पद उपक्रमात सोमनाथ भगत, निलेश पवार, अशोक हेमके, गजानन चव्हाण, बाळासाहेब आरोटे, प्रविण भटाटे, काळू भोर, रोशन लहाने, नितीन भागवत, विकास जाधव, ज्ञानेश्वर मांडे यांच्यासह शेकडो गिर्यारोहक सहभागी होतात.

कोणतीही यात्रा, उत्सव धार्मिक कार्यक्रम सार्वजनिक कार्यकम हे संपन्न झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. हा कचरा पर्यावरणास हानिकारक असल्याने पर्यावरणाचा र्‍हास होतो. राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाई मातेच्या भक्तीच्या ओढीमुळे शिखर सर करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या या उपक्रमातच मंदिर परिसर व शिखराचे पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेस या वर्षीही युवकांनी प्रतिसाद दिला असून यापुढेही हा उपक्रम कायम चालू राहील. – भगीरथ मराडे

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -