स्मार्ट रोड कामासाठी अशोक स्तंभ चौक उद्यापासून बंद

Ashok Column Chowk closed tomorrow for smart road work

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या स्मार्ट रोडचे काम चालू आहे. आता शेवटचा टप्पा असलेल्या अशोक स्तंभ चौक सुशोभीकरणाचे काम सुरु केले जाणार असून अशोकस्तंभ चौक शुक्रवार (दि.२२)पासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दीड महिना बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी अधिसूचनेव्दारे केले आहे.

स्मार्टरोडचे काम दीड वर्षांपासून सुरु असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी वाहनचालक करु लागले आहेत. त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ दरम्यान स्मार्टरोडचे काम झाले असून आता अशोकस्तंभ चौकाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यामुळे चौक दीड महिना बंद ठेवला जाणार आहे. अशोकस्तंभाकडे येणार्‍या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, यासाठी शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केला असून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चौकाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यात येणार आहे.

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे

  • सीबीएस, मेहेर चौकाकडून अशोकस्तंभाकडे न जाता रेडक्रॉस सिग्नलकडे जावे.
  • सीबीएसकडून पंचवटीकडे जाण्यासाठी अवजड वाहने आणि बसेस सीबीएस सिग्नल, टिळकवाडी मार्गे कॅनडा कॉर्नरवरुन जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्सकडून रामवाडीमार्गे पंचवटीकडे जावे.
  • रविवार कारंजा ते रेडक्रॉसची वाहतूक दुहेरी असणार आहे.
  • गंगापूर रोडवरुन येताना वाहनचालकांनी गुरांचा दवाखान्यापासून घारपुरे घाटमार्गे जावे.
  • रामवाडी पुलाकडून अशोकस्तंभाकडे दुचाकी वाहनांना परवानगी असून इतर वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
  • गुरांचा दवाखाना मार्ग नो-पार्किंग, नो-हॉल्टिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
  • घारपुरे घाट परिसरात पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.