घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसायलेन्सर मॉडिफाइड करणार्‍यांना दणका; कॉलेज रोडवर १३ बुलेट जप्त

सायलेन्सर मॉडिफाइड करणार्‍यांना दणका; कॉलेज रोडवर १३ बुलेट जप्त

Subscribe

नाशिक : बुलेटचा सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणार्‍या कॉलेजरोड रोडवर फिरणार्‍या १३ बुलेटचालकांवर बुधवारी (दि.२०) गंगापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत १३ बुलेट जप्त केल्या. त्या बुलेट तपासणीसाठी गुरुवारी आरटीओ पाठविल्या जाणार असून, प्रत्येक बुलेटमालकास २० ते २५ हजार रुपये दंड आकारला आहे. त्यामुळे मॉडिफाइड सायलन्सर करणार्‍या बुलेटमालकांचे धाबे दणाणले आहेत.

नाशिक शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे प्रमाण वाढले आहे. त्याचा त्रास नाशिककरांना होत आहे. याप्रकरणी काही नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहे. शिवाय, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत फिरणार्‍या बुलेटचालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे, पोलीस नाईक रवींद्र मोहिते, पोलीस समाधान आहेर, संदीप गायकवाड, प्रकाश दळवी, हरीशकुमार चौरे, मच्छिंद्रनाथ वाघचौरे यांनी १३ बुलेट ताब्यात घेतल्या. मोटार वाहन कायद्यानुसार गंगापूर पोलिसांनी बुलेटमालकांना नोटीस दिली आहे.

बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून गंगापूर पोलीस ठाणेहद्दीत फिरणार्‍या ५४ बुलेटचालकांवर कारवाई केली जात आहे. ही कारवाई नियमित केली जाणार आहे. बुधवारी कॉलेज रोडवर १३ बुलेटचालकांवर कारवाई करण्यात आली. बुलेट जप्त केल्यानंतर त्या आरटीओ कार्यालयात नेल्या जातात. या ठिकाणी सायलेन्सरची तपासणी करत आवाजाची मर्यादा मोजली जाते. त्यानंतर चालकांना दंड आकारला जात आहे. सायलेन्सर काढून घेत दंड भरल्यानंतर बुलेट चालकांच्या ताब्यात दिली जात आहे. पुन्हा तिच बुलेट आढळून आल्यास मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. : रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -