म्हसरुळ परिसरात बिबट्यासाठी पिंजरा

म्हसरुळ परिसरातील वरवंडी रोडवर असलेल्या उखाडे मळ्यात बिबट्याच्या दर्शनाने खळबळ उडाली असून मळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या मागणीवरून वनविभागाने
उखाडे मळ्यात तातडीने पिंजरा लावला आहे.

वरवंडी रोडवर उखाडे यांचेसह मोराडे, गरूड, शिर्के, जाधव, शिंदे, चव्हाणके यांचेही मळे आहेत. म्हसरूळ येथील ग्रामस्थ बाळासाहेब उखाडे व निलेश उखाडे हे इतरांबरोबर बुधवारी रात्रीच्या दरम्यान शेतातील मिरची पिकाला पाणी देत होते. दिवसा कडक उन्ह असल्याने ते रात्री अकरा-साडेअकराला बॅटरीच्या उजेडात पाणी देत असताना त्यांना अचानक बिबट्या दिसला असता ते भयभीत झाले. याप्रकरणी उखाडे यांनी वनविभागाला कळविले असता त्यांनी गुरूवारी (दि.७) अधिकार्‍यांनी या भागाची पाहणी केली. दरम्यान, बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. यामुळे या परिसरात पिंजराही लावला असून त्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी गरुड वस्तीत बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यावेळी त्याने एका वासरास लक्ष करीत हल्लादेखील केला होता. त्यामुळे या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.