घरमहाराष्ट्रनाशिकझालेली परीक्षा रद्द करत तारखा जाहीर केल्या; आता मागवले सल्ले

झालेली परीक्षा रद्द करत तारखा जाहीर केल्या; आता मागवले सल्ले

Subscribe

आरोग्य विद्यापीठाचे वरातीमागून घोडे

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एमबीबीएस द्वितीय वर्षातील मायक्रोबायोलॉजी-१ विषयाचा झालेला पेपर रद्द करुन सुधारीत तारखा जाहीर केलेल्या असताना आता या निर्णयावर पुन्हा विद्यार्थ्यांची मते मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील २६ मार्च रोजी ही परीक्षा पुन्हा होणार की नाही, याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाने घेतलेल्या पूर्व परीक्षेतील बहुतांश प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएसच्या मुख्य परीक्षेत विचारण्यात आल्याची बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आली आल्यानंतर मायक्रोबॉयलॉजी-१ चा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

एमबीबीएससारख्या महत्वाच्या परीक्षेत नोव्हेंबर २०२१  मध्ये घेतलेल्या मायक्रोबायोलॉजी या विषयाच्या पूर्व परीक्षेतील जवळपास ७  प्रश्न आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे विचारण्यात आल्याची बाब पडताळणीतून विद्यापीठाच्या निदर्शनास आली. त्यामुळे हा पेपर पेपर त्वरित रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी यासंदर्भात कार्यालयीन परिपत्रकात म्हटले आहे की, द्वितीय वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायोलॉजी-१ विषयाची विद्यापीठ लेखापरीक्षा शुक्रवारी ११ मार्चला ४१ परीक्षा केंद्रावर दुपारच्या सत्रात झाली. या परीक्षेची विद्यार्थ्यांची कामगिरी रद्दबादल करण्यात येत आहे.

- Advertisement -

महाविद्यालयीन स्तरावर झालेल्या घटनेमुळे सदर अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तसेच विद्यापीठ कार्यप्रणालीमध्ये असलेली पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राहावी याकरिता सदर अभ्यासक्रमाच्या विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येत आहे.त्यामुळे द्वितीय वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजी-१ (२०१९ अभ्यासक्रम) विषयाची विद्यापीठ लेखी परीक्षा पुन:श्च शनिवारी २६ मार्चला सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत यापूर्वीच्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. (मात्र द्वितीय वर्ष एमबीबीएस जुना अभ्यासक्रम यांच्या मायक्रोबायोलॉजी-१ विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येणार नाही. त्यांची ११ मार्चची कामगिरी ग्राह्य धरण्यात येईल.) विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत महाविद्यालयामार्फत जे प्रवेश पत्र वितरित करण्यात आले त्यात प्रवेश पत्रावर त्यांना सदरील पुनर्परीक्षेसाठी बसण्यास परवानगी देण्यात येईल.

द्वितीय वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमाची सर्व विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा ही २३ मार्च पासून न होता दिनांक २८ मार्चपासून सुरू होईल, असे आदेश दिल्यानंतर आता विद्यापीठाने या निर्णयाविषयी राज्यातील सहा हजार विद्यार्थ्यांकडे मत मागितले आहे. त्यासाठी गूगल फॉर्म दिला असून त्यावर विद्यार्थ्यांना आपली प्रतिक्रिया नोंदवण्याचे आदेश परीक्षा नियंत्रकांनी दिले आहेत. त्यासाठी १६ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. लिंकद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा पुन्हा घ्यावी की नाही, अशी विचारणा करण्यात आली आहे. तसेच, विद्यार्थ्याचे नाव, मोबाईल क्रमांक आणि परीक्षेचा रोल नंबर देणे बंधनकारक असून, विद्यार्थ्यांच्या या मतांच्या आधारे परीक्षेचा पुनर्विचार केला जाणार असल्याचे समजते. विद्यापीठाने स्वत:च्या निर्णयाचा फेरविचार सुरु केल्याने एमबीबीएसची फेरपरीक्षा होणार की नाही याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
निर्माण झाला आहे.

मायक्रोबायोलॉजी विषयासंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयास विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला आहे. तर काही महाविद्यालयाच्या डीन व प्राचार्यांनीही विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे आम्ही राज्यातील विद्यार्थ्यांचे मते मागवत असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.- डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -