घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआ. दिलीप बोरसेंमुळे आरोग्यसुविधेचे तीनतेरा; माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा गंभीर आरोप

आ. दिलीप बोरसेंमुळे आरोग्यसुविधेचे तीनतेरा; माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा गंभीर आरोप

Subscribe

नाशिक : बागलाण तालुक्यात आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले असून शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांची बिकट अवस्था, डॉक्टर, कर्मचार्‍यांची अरेरावी आणि आमदार दिलीप बोरसे यांचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांसह सर्वसामान्य रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याने ‘आमदार मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर, बागलाणचा आदिवासी बांधव वार्‍यावर’ असे चित्र निर्माण झाल्याचा आरोप बागलाणच्या माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी केला.

दीपिका चव्हाण यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार व आमदार बोरसे यांचे असलेले दुर्लक्ष यावर थेट आरोप केले. त्या म्हणाल्या की, आदिवासी भागात पुरेशा प्रमाणात आरोग्यसुविधा मिळत नसल्याने गरोदर मातांवर योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे माता मृत्यू, कुपोषित बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना तालुक्यात आरोग्य विभागासाठी येणारा निधी जातो कुठे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील कपालेश्वर येथील आदिवासी महिलेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार न करता तिला डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. केंद्रात ड्युटीवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला नाईलाजास्तव डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागले. या घटनेमुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

बागलाणच्या आदिवासी जनतेला वार्‍यावर सोडून स्वत:ला आदिवासींचे कैवारी म्हणवून घेणारे आमदार दिलीप बोरसे मध्यप्रदेशच्या दौर्‍यात दंग आहेत, हे बागलाणचे दुर्दैव आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तालुक्यातील मुल्हेर येथील ग्रामीण रुग्णालयासाठी भरीव निधीची तरतूद करून घेतली होती. मात्र, अजूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. शहरालगत भाक्षी शिवारात उपजिल्हा रुग्णालयासाठी इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली. चालू अर्थसंकल्पात या इमारतीसाठी आमदारांनी भरीव निधीची तरतूद करून घेणे आवश्यक होते. मात्र, तसे झालेले नाही. त्याचबरोबर सटाणा, डांगसौंदाणे व नामपूर ग्रामीण रुग्णालयांसह ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांची अनेक पदे रिक्त आहेत. तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, हे आमदार दिलीप बोरसे यांचे मोठे अपयश असल्याची घणाघाती टीकाही माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.

आदिवासी बांधवांच्या आरोग्यासाठी मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाचे काम मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे. बागलाण तालुक्यातील आरोग्यसुविधांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराबाबत लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. : दीपिका चव्हाण, माजी आमदार, बागलाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -