घरमहाराष्ट्रनाशिकअजमेर सौंदाणे कोविड सेंटरबाबत तक्रारी

अजमेर सौंदाणे कोविड सेंटरबाबत तक्रारी

Subscribe

कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय दूर करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

प्रकाश शेवाळे : जायखेडा
बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथे कोविड १९ सेंटरची निर्मिती करण्यात आली असून तालुक्यातील व परिसरातील सर्व संबंधित रुग्णांची व्यवस्था येथे करण्यात येत आहे. मात्र, येथे उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांनी तेथील गैरसोयींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून तेथील असुविधांमुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
आजपावेतो कोविड १९ वर कोणतेही ठोस औषध निर्माण झालेले नसल्याने येथील रुग्णांची  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना प्रथिनयुक्त संपूर्ण सकस आहार देणे आवश्यक असताना प्राप्त माहितीनुसार तसे नसल्याने तक्रारी आहेत. तेथील अस्वस्थता व गैरसुविधांमुळे संबंधित रुग्ण तेथे दाखल होण्यास व स्वॅब देण्यासही घाबरत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक रुग्णांकडून या साथीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाकडून यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यास रुग्ण ज्या गावातील आहेत, तेथील ग्रामपंचायतीकडून १४ व्या वित्त आयोगामार्फत सदरचा खर्च भागविणे शक्य आहे. तरी अजमेर सौंदाणे येथील कोविड १९ सेंटरमधील सर्व रुग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळणेसाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सनदशीर मार्गाने उपोषण व आंदोलन करतील व त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, माजी जि. प. सभापती यतिन पगार, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पं. स. उपसभापती इंदुबाई ढुमसे, माजी पं. स. सभापती रामकृष्ण अहिरे, शोएब शेख आदी उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -