शासकीय काम अन्‌ सहा महिने थांब

महाविद्यालयांना शासन आदेशाची प्रतीक्षा

नाशिक : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर विद्यापीठांनी महाविद्यालयापर्यंत वेळेत सूचना न पाठवल्यामुळे गुरुवारी (दि.6) विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापकांमध्ये प्रंचड गोंधळ दिसून आला. निर्णय घेतला तरी लेखी आदेश किंवा सूचना येईपर्यंत त्याची अमंलबजावणी होत नाही म्हणून आपल्याकडे ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ असे उपरोधिकपणे म्हटले जाते. पहिल्याच दिवशी महाविद्यालयांनाही याची प्रचिती आली.

राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे येथील शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर ज्या ठिकाणी रुग्ण संख्या दुपटीने वाढत आहे, अशा ठिकाणी स्थानिक परिस्थिती विचारात घेवून प्रशासनाने निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु, राज्यातील महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी घेतला.

त्यानुसार शासनाने विद्यापीठांना लेखी आदेश ई-मेलद्वारे त्वरीत पाठवणे आवश्यक होते. एका ई-मेलसाठी किती वेळ लागतो, हे सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे या निर्णयाची तत्काळ अमंलबजावणी होईल, अशी पालक, विद्यार्थ्यांसह प्राचार्य व प्राध्यापकांनाही खात्री होती. परंतु, जोपर्यंत लेखी आदेश किंवा सूचना प्राप्त होत नाहीत तोपर्यंत महाविद्यालये बंद कशी ठेवणार, असाही प्रश्न आहे.

त्यामुळे गुरुवारपर्यंत महाविद्यालयांना आदेशच प्राप्त न झाल्याने शहरातील बहुतांश महाविद्यालये नियमितपणे सुरु असल्याचे चित्र दिसून आले. विद्यार्थी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच आढळल्याने, असा काही निर्णय झाल्याचे त्यांना माहितीही नव्हते.

मैदानांवर विद्यार्थ्यांची तोबा गर्दी

मंत्र्यांनी महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला तरी आदेश नसल्यामुळे प्राध्यापकांनाही अडचण झाली. वर्गात विद्यार्थ्यांना शिकवावे की नाही, असा प्रश्न त्यांना पडला. प्राध्यापकांनी लेक्चर्स न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी ही संधी साधत महाविद्यालयाच्या मैदानावर खेळ मांडला होता. यात अभियांत्रिकी महाविद्यालयांचाही समावेश होता. नोटीस बोर्डवर कुठल्याही प्रकारची सूचना नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अजूनही गोंधळ मिटलेला नाही.