कोरोनामुळे यंदाही पहाट पाडव्याचे स्वर हरवणार

आयोजक संभ्रमात : संगीत मैफलीच्या आयोजनात नियमांतील स्पष्टतेचा अडसर

नाशिक : सांस्कृतिक वातावरणात भर टाकणार्‍या मैफलींमध्ये महत्त्वाचा वाटा पाडवा पहाटचा आहे. पाडवा पहाट म्हणजे सांस्कृतिक वर्षाची नव्याने सुरुवात करणारा उत्सवच. नाशकात गेल्या काही वर्षांपासून पाडवा पहाट या उपक्रमाला बहर आला आहे. परंतु, कोरोनामुळे रसिक या कार्यक्रमांना मुकले. कोरोनाची लाट ओसरू लागली असून शासनाने निर्बंधातून शिथीलता दिल्याने जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. परंतु, खुल्या जागेवरील कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने यंदाही रसिक पहाट पाडव्याच्या मैफलीला मुकणार आहेत.

शहराला स्वत:चा सांस्कृतिक चेहरा प्राप्त व्हावा, यासाठी विविध संस्था सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करत असतात. या कार्यक्रमांमध्ये आपले वेगळेपण जपणारा एक उत्सव म्हणजे पाडवा पहाट. पुण्याच्या धर्तीवर नाशकात पाडवा पहाट हा उपक्रम सुरू झाला, केवळ सुरूच झाला नाही तर तो यशस्वीही झाला. केवळ पिंपळपारावर होणारी मैफल आता अनेक मोठ्या संस्थामध्येही होऊ लागली आहे. शहरभरात किमान उपनगरांमध्येही पाडावा पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ‘पाडवा पहाट’ व ‘सांज पाडवा’ भाऊबीजेसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. पाडवा पहाट सारखीच ‘सांज पाडवा’ या नावाने कार्यक्रम सुरू केले. गेल्या दोन वर्षांपासून तर कोविडमुळे या कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकले नाही. यंदा कोरोनाची लाट बर्‍यापैकी ओसरली आहे. त्यामुळे शासनाने कोरोना निर्बंधातून शिथीलता दिली आहे. नाट्यगृहे, चित्रपटगृहांनाही परवानगी देण्यात आली आहे मात्र मोकळ्या पटांगणावरील कार्यक्रमांबाबत अद्याप शासनाकडून कोणतीही नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे आयोजक संभ्रमात आहेत. जरी शासनाने परवानगी दिली, तरी गायकांच्या तारखा मिळवणे, इतक्या कमी वेळेत आयोजन करणे शक्य नाही, त्यातच दिवाळीनंतर तिसर्‍या लाटेचा धोका वर्तविण्यात आल्याने अनेक आयोजकांनी खबरदारीचा उपाय म्हणून यंदाही कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहाट पाडव्याच्या तयारीसाठी किमान महिनाभरापूर्वी नियोजन करावे लागते. यंदा कोविडमुळे शासनाने निर्बंध शिथील केले असले तरी, अद्यापही काही भागामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव आहे त्यामुळे यंदा कार्यक्रमांचे नियोजन नाही.

           – सतीश कुलकर्णी, महापौर

 

पाडवा पहाट आयोजित करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. परंतु, कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पुण्यात पाडवा पहाटला परवानगी दिली आहे, परंतु नाशकात अद्याप तशी स्पष्टता नसल्याने संभ्रम आहे. 

         – शाहू खैरे, अध्यक्ष, संस्कृती नाशिक

गोदा श्रध्दा फाउंडेशनच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून सांज पाडव्याचे आयोजन केले जाते. यंदाही पोलीस प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. परंतू अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे परवानगीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल.
                   – सुरेश (अण्णा) पाटील, अध्यक्ष, गोदा श्रध्दा फांउडेशन

कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होतोय. दिवाळीनंतर पुन्हा तिसर्‍या लाटेचा इशारा वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमांच्या आयोजनातून पुन्हा नागरिकांची गर्दी होऊन कोरोना प्रादूर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून यंदाही कार्यक्रम रद्द करतोय.

              – प्रथमेश गीते, मुंबई नाका मित्र मंडळ

Devyani_Farandeदरवर्षी प्रमोद महाजन उद्यानात पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतू आयोजनाबाबत परवानगी मिळालेली नाही. जरी या कार्यक्रमांना परवानगी मिळाली तरी कमी वेळेत तयारी करणे शक्य नाही. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होतोय परंतू तरीही काळजी घेणे आवश्यक असल्याने यंदा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही..

               – आमदार देवयानी फरांदे