घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदिलीप दातीर यांचा राजीनामा, मनसेचा पुढचा शिलेदार कोण?

दिलीप दातीर यांचा राजीनामा, मनसेचा पुढचा शिलेदार कोण?

Subscribe

नाशिक : मनसे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी शहराध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार याची चर्चा घडू लागली आहे. दुसर्‍या फळीतील काही नावांसोबतच अनुभवी नावाचीही चर्चा घडून येऊ लागली आहे. यात प्रामुख्याने जिल्हाप्रमुख अंकुश पवार, माजी नगरसेवक सलिम शेख, मनोज घोडके यांची नावे चर्चेत आहेत. यातील कोणाच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडणार याबाबत पुढील आठवड्याभरात राज ठाकरे निर्णय घेतील असे बोलले जात आहे.

मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी मंगळवारी (दि.१९) राज ठाकरे यांना पत्र पाठवत शहराध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. हा राजीनामा ‘राज दरबारातून’ मंजूर झाला की नाही या बाबत सस्पेन्स आहे. मात्र राज ठाकरे यांची एकूणच कार्यपद्धती बघता आणि पूर्वानुभव लक्षात घेता दातीर यांचा राजीनामा अप्रत्यक्षरीत्या स्वीकारलाच जाईल अशी दाट शक्यता आहे. अशातच, मनसेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नाशिक शहराच्या अध्यक्षपदी पुढचा चेहरा कोण याबाबत चर्चांना वेग आला आहे. यामध्ये शहरातील जुने निष्ठावान दुसर्‍या फळीतील काही नावांसोबतच सध्या जिल्हाध्यक्ष पदावर असलेले व याआधी शहराध्यक्ष पदाचा अनुभव असलेल्या अंकुश पवार यांचे नाव पुढे येत आहे. माजी नगरसेवक सलिम शेख यांच्या खांद्यावरही ही जबाबदारी येऊ शकते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव सलिम शेख ही जबाबदारी स्वीकारतील की नाही याबाबत शंका आहे.

- Advertisement -

माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर प्रदेश कार्यकारिणीची जबाबदारी असल्याने त्यांचा विचार शहराध्यक्षपदासाठी होण्याची शक्यता कमीच आहे. इतर वरिष्ठ नेत्यांना आता राज्यस्तरीय पदांची महत्वाकांक्षा असल्याने ते या पदासाठी इच्छुक नसल्याचेही बोलले जात आहे. यामध्ये पराग शिंत्रे यांच्या नावाची काही महिन्यापूर्वी शहराध्यक्ष पदासाठी चर्चा होती. त्या अनुषंगाने त्यांनी मोर्चेबांधणीही केल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांची नुकतीच थेट प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने ते पुन्हा आता शहराध्यक्ष पदासाठी उत्सुक नसतील तसेच पक्षही लगेच नवीन जबाबदारी देईल याचीही शक्यता कमीच आहे.दुसर्‍या फळीतील उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे यांचीही नावे चर्चेत आहे.

तन, मन, धनाने लढणारा पदाधिकारी

आजमितीस जी नावे पुढे येत आहेत, ती बघता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सक्षमपणे पेलणारे अंकुश पवार यांच्याच गळ्यात पुन्हा शडराध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहेे. अंकुश पवार यांना शहराध्यक्षपदाचा ताजा अनुभव आहे. त्यांनी शहराध्यक्षपदाच्या कार्यकाळात संघटन बांधणीसाठी तन, मन, धनाने प्रयत्न केले होते. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मुलाखती घेऊन इच्छुक उमेदवारांची यादी तयारी केली होती. अनेक आंदोलने उभे करुन त्यांनी शहरात मनसेला चर्चेत ठेवले होते. शिवाय कार्यकर्त्यांचा मोहळ त्यांच्याकडे आहे. वरिष्ठांचा आदर राखताना तळागाळातील कार्यकर्त्यालाही आपलेसे करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. पक्षातील गळती थांबवण्यासह महापालिकेच्या निवडणुकीत मनसेची ‘हवा’ करण्याची क्षमता पवार यांच्यातच आहे. त्यामुळे त्यांचीच शहराध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -
ठरू शकतो काटेरी मुकूट

एकेकाळी सर्वात मोठा पक्ष असलेल्या मनसेला मोठी उतरती कळा लागली. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्ष असूनही सर्व जागांवर उमेदवार उभे करायला पण मोठी कसरत करावी लागली होती. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत जर ठसा उमटवला नाही तर शहरात पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच पक्षात असलेली गटबाजी व संघटनेतील मरगळ अशा परिस्थितीत नाशिक शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणे म्हणजे काटेरी मुकुट डोक्यावर घेण्यासारखी बाब ठरू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -