घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआदिवासी बुरकुलवाडीच्या वाट्याला मुलभूत सुविधांची वाणवा

आदिवासी बुरकुलवाडीच्या वाट्याला मुलभूत सुविधांची वाणवा

Subscribe

मनमाड : देश पारतंत्र्यातून मुक्त होण्याला 75 वर्षे लोटली आणि देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या असल्या तरीही आदिवासी समाजापर्यंत विकासाची गंगा अजूनही पोहोचलेली नाही. मनमाडसारख्या बुरकुलवाडीतही अशीच दूरवस्था आहे. त्यामुळे आजही त्यांच्या वाट्याला समस्यांचा डोंगर आलेला आहे.

आज (दि.9 ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा होत असताना बुरकलवाडीत मात्र जगण्याचा संघर्ष आजही कायम आहे. दलित, आदिवासी वस्तीमधील मुलभूत सुविधांसाठी शासनाकडून दरवर्षी पालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात निधी पाठवला जातो. एवढ्या वर्षांत पाठवलेला हा निधी नेमका गेला कुठे, असा प्रश्न स्थानिक आदिवासी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही नागरिक करत आहेत.

- Advertisement -

मनमाड शहरालगत आणि नगर परिषदेच्या हद्दीत नांदगाव मार्गालगत बुरकुलवाडी वस्तीत शेकडो आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्यांपासून राहतात. त्यांच्याकडे रेशनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड असून, ते सर्व पालिकेला कर भरतात आणि निवडणुकांमध्ये नियमितपणे मतदानाचा हक्कही बजावतात. असे असतानाही त्यांच्या वस्तीत गटारी, रस्ते, शौचालय नाही. विजेचे खांब आहेत मात्र लाईट नाही. फरशी पूल वाहून गेल्याने नदी ओलांडून मुलांना शाळेत जावे लागते. अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात आदिवासी बांधव अडकलेले आहेत.

या वस्तीत केवळ दोन ठिकाणी पाईपलाईन असून, त्यातून महिन्यातून दोनवेळा पाणीपुरवठा केला जातो. रस्ते व गटार नसल्याने घरासमोर घाण पाणी तुंबते. त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. स्वच्छ भारत योजनेंतर्गत शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. मात्र, अर्ज करूनही आम्हाला अनुदान मिळाले नाही. त्यामुळे आजही येथील महिलांना उघड्यावर जावे लागले. दुसरीकडे पावसाळ्यात पूर आल्यावर मुलांना सक्तीची सुटी घ्यावी लागते. या नदीवर छोटा पूल बांधून देण्याची अनेकदा मागणी करुनही राजकीय उदासीनतेमुळे एकही मागणी पूर्ण झालेली नाही. विशेष म्हणजे ही वस्ती पालिकेच्या हद्दीत असल्याने नागरिकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची व नगरसेवकांची असतानाही प्रश्न कायम आहे.

- Advertisement -

आम्ही फक्त मतदानासाठी ?

नगरपरिषद, विधानसभा व लोकसभा या तिन्ही निवडणुकांवेळी उमेदवार येतात आणि तुमच्या समस्या सोडवू, असे आश्वासन देतात. निवडून गेल्यानंतर आमच्याकडे कुणीही ढुंकूनदेखील पाहत नसल्याची तक्रार येथील महिलांनी केली. आम्ही केवळ मतदान करण्यासाठीच आहोत का, असा संतप्त सवालही बुरकुलवाडीतील उपस्थित केला. आमदार सुहास कांदे यांनी अनेक वाड्या-वस्त्यांच्या समस्या मार्गी लावल्या आहेत. त्यांनी आमच्या समस्या सोडवून न्याय द्यावा, अशी मागणीही संगीत सोनवणे, सुमन सोनवणे, सविता मोरे, सागर मोरे, सूरज मोरे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -