घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रघराबाहेर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला

घराबाहेर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला

Subscribe

नाशिक : मागील महिन्यात म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवरील जाधव-देशमुख वस्तीवर पाच वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता मोराडे इस्टेट येथील मोरे वस्तीवर राहणार्‍या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यात युवकाच्या डाव्या हाताला बिबट्याचे दात लागले असून बराच रक्तस्त्राव झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पाथर्डी गाव व मळे परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने आता शहरातील नागरिकांचेही धाबे दणाणले आहे.

याबाबत अधिक माहिती म्हसरूळ येथील मोराडे इस्टेट भागात शेतकर्‍यांच्या बर्‍याच वस्त्या आहेत. याच ठिकाणी मोरे कुटुंबीयांची शेती आहे. ही शेती बंडू नाना थाळकर व कुटुंब सांभाळत आहे. येथे जवळपास २० ते २२ जणांचे कुटुंब वास्तव्य करते. यातील काही सदस्य शेतमजूर म्हणून काम करतात तर काही खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या कुटुंबातील जवळपास दहा ते बारा सदस्य हे घराबाहेरच्या अंगणात झोपलेले होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने भारत बंडू थाळकर (वय ४०) यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या डाव्या हाताला धरून ओढत घेऊन नेण्याचा प्रयत्न केला. इतर सदस्यांचा आरडाओरडा सुरू झाला. त्याचवेळी भारत यांनी बाहेर असलेल्या चुलीजवळील लाकूड उजव्या हातात घेऊन बिबट्यास मारले अन् बिबट्याने त्यांचा हात सोडून धूम ठोकली. या हल्ल्यात भारत यांच्या डाव्या हाताला बिबट्याचे तीन ते चार दात लागले असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी भदाने, उपवनरक्षक अधिकारी पंकज गर्ग यांच्या आदेशान्वये वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, वाहनचालक अशोक खांजोळे यांनी हल्ला झालेल्या ठिकाणासह परिसराची पाहणी केली. तसेच वनपाल उत्तम पाटील आणि जखमी भारत यास स्वतः शासकीय रुग्णालयात उपचारार्थ घेऊन गेले. सुदैवाने भारत थाळकर याचे प्रकृती स्थिर आहे. या परिसरातील बिबट्याचा वावर पाहता घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या नाल्यालगत पिंजरा लावण्यात आला आहे.

गौळाणे शिवारात पुन्हा बिबट्याच दर्शन

गौळाणे शिवारात रविवारी (दि. ७) रात्री ९ वाजेच्या सुमारास पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. याआधी २ ऑगस्टलाही याचठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले होते. बिबट्याचा वाढता वावर पाहता ग्रामस्थ भयभीत झाले असून या भागात कायमस्वरूपी पिंजरा लावावा अशी मागणी केली जात आहे. गौळाणेतील शेतकरी शांताराम चुंबळे यांच्या घराच्या आवारात २ ऑगस्टला बिबट्याने शिरकाव केला होता. रविवारी रात्री पुन्हा बिबट्याचा मुक्तसंचार दिसून आला. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हा बिबट्या कैद झाला असून, याबाबत वनविभागास माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -