घरमहाराष्ट्रनाशिकमराठा समाजाभोवती निवडणुकीचे चक्रे

मराठा समाजाभोवती निवडणुकीचे चक्रे

Subscribe

विकासाचे मुद्दे बासनात गुंडाळून नाशिक लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जातीय समीकरणे जुळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. विशेषत: सर्वच पक्षांनी मराठा समाजावर लक्ष केंद्रित केले आहे.

विकासाचे मुद्दे बासनात गुंडाळून नाशिक लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जातीय समीकरणे जुळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. विशेषत: सर्वच पक्षांनी मराठा समाजावर लक्ष केंद्रित केले आहे. समाजातील निवडक प्रतिष्ठितांची बैठक नुकतीच मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर नाशकातही गेल्या तीन दिवसांपासून युती आणि आघाडीच्या उमेदवारांकडून ठिकठिकाणी समाजाचे मेळावे घेतले जात आहेत. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीमुळे मराठा समाजाच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रिपाइं आठवले गटानेही मराठा समाजाचा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केल्याने युतीच्या पोटात गोळा आला आहे.

पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात जातीय बाबींभोवती निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न होत आहे. अर्थात बहुतांश मतदार जातीपेक्षा विकास कामे करणार्‍यांना प्राधान्य देत असल्यामुळे ही समीकरणे बिघडण्याचीही शक्यता असते. असे असले तरीही नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या जातीनिहाय व्यूहरचना करण्याचा घाट घातला जात आहे. या मतदारसंघात १८ लाख ५३ हजार ५११ मतदार आहेत. त्यात मराठा समाजाचे साधारणत: साडेपाच लाख मतदार आहेत. म्हणजेच एकूण मतांच्या ३५ टक्के मते मराठा समाजाची आहेत. पावणेतीन लाख मतदार हे ओबीसी संवर्गातील आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी जातीय आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने यंदा माळी समाजाचे समीर भुजबळ यांना उमेदवारी दिल्याने आघाडीला आता मराठा समाजाला आकर्षित करण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी स्वत: बाळासाहेब वाघ, डॉ. प्रताप वाघ, डॉ. प्रदीप पवार, माधवराव पाटील, देवीदास पिंगळे, डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, राहुल ढिकले आदी मराठा समाजाच्या नेत्यांची आवर्जुन गृहभेट घेतली.

- Advertisement -

दुसरीकडे समाजाची मोट बांधण्यासाठी दस्तुरखुद्द पक्षप्रमुख शरद पवार यांनी नाशकातील निवडक प्रतिष्ठांबरोबर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर नाशिकमध्ये समाजाचे ठिकठिकाणी मेळावे घेतले जात आहेत. दुसरीकडे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे मराठा समाजाचे असले तरीही त्यांच्यासमोर मतांच्या विभागणीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. भुजबळांचे ‘सोशल इंजिनिअरिगं’ आणि मराठा समाजाचे तुल्यबळ अपक्ष उमेदवार याचा फटका युतीलाच बसेल असे बोलले जात आहे. मात्र, जातीचे कार्ड आपणही वापरल्यास ओबीसी आणि अन्य समाज संघटीत होऊन तो विरोधात उभा ठाकू शकतो, अशी भीती सध्या युतीच्या उमेदवाराला डाचत आहे. त्यामुळे युतीने सध्या तरी सावध भूमिका घेत जातीय समीकरणांची आकडेमोड सुरू केली आहे. अशातच माजी आमदार तथा भाजपचे नेते माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. मराठा आरक्षण मेळाव्यांमध्ये त्यांचा सहभाग आणि समाजावर असलेले प्राबल्य लक्षात घेता त्यांच्या मतांमुळे युतीच्या मतांमध्ये विभागणी होईल, असे मानले जात आहे. हाच न्याय कोकाटेंना लागू होत असून युतीमुळे त्यांची मते कमी होण्याची चिन्ह आहेत.

मराठा आरक्षण समितीचे समन्वयक करण गायकवर यांनीही अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन काळात समाजातील मतदारांशी वाढलेला संपर्क आणि नातेसंबंध या जोरावर ते उमेदवारी करीत आहेत. अशातच रिपाइंच्या आठवले गटानेही यंदा आश्चर्यकारकरित्या मराठा समाजाचा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. देशात आणि राज्यात आठवले गट युतीच्या समवेत असला तरीही मनोमिलन बैठकांमध्ये आपल्याला योग्य तो मानसन्मान न मिळाल्याने आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यात मराठा समाजाचा उमेदवार उभा करण्याचा प्रस्ताव रामदास आठवले यांना मांडणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे युतीच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

- Advertisement -

१६ खासदारांमध्ये १२ खासदार मराठा समाजाचे

नाशिक लोकसभा निवडणुकीत नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांचे प्राबल्य राहिलेले आहे. आजवर झालेल्या १६ निवडणुकांमध्ये मराठा समाजाचे १२ उमेदवार निवडून आले आहेत. यात भानुदास कवडे हे १९६७ आणि १९७१ च्या निवडणुकीत लागोपाठ दोन वेळा निवडून आले. त्यानंतर अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे, प्रताप वाघ, मुरलीधर माने, दौलतराव आहेर, डॉ. वसंत पवार, राजाभाऊ गोडसे, माधवराव पाटील, उत्तमराव ढिकले, देविदास पिंगळे आणि हेमंत गोडसे यांना संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मराठेतर समाजातील आजवर झालेल्या खासदारांमध्ये गोविंदराव देशपांडे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि समीर भुजबळ या तिघांचा समावेश आहे.

जिल्ह्यात युतीचे पाच आमदार मराठा

नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात मराठा समाजाचे पाच आमदार आहेत. विशेष म्हणजे हे पाचही आमदार युतीतील आहेत. यात शिवसेनेचे तीन तर भाजपच्या दोन आमदारांचा समावेश आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकही आमदार मराठा समाजाचा नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -