कब्रस्तानच्या जागेवरील अतिक्रमणे जमीनदोस्त; शालिमार चौकाने घेतला मोकळा श्वास

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या शालिमार चौकात कब्रस्तानच्या आरक्षित जागेवर गेल्या २० वर्षांपासून बस्तान मांडलेल्या दुकानांचे अतिक्रमण महापालिका प्रशासनाने गुरुवारी (दि.४) जमीनदोस्त केले. या कारवाईदरम्यान अतिक्रमणधारक आक्रमक झाल्याने वातावरण काहीवेळ तणावमय झाले होते, मात्र पोलिसांच्या फौजफाट्यामुळे मोहीम यशस्वी झाली.

महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील रस्त्याकडेला असलेल्या या व्यावसायिकांना महापालिकेने दुकाने हटविण्यासंदर्भात नोटीसा दिल्या होत्या. तसेच, बुधवारी सूचितही केले होते. शालिमार चौकातील मुस्लिम समाजाच्या दोन एकर कब्रस्तानच्या आरक्षित जागेवर २० वर्षांपासून व्यावसायिकांनी बस्तान मांडलेले होते. ही अतिक्रमणे हटविण्याची वारंवार मागणी होत होती. यासंदर्भात कुतबोद्दीन शेख यांनी २०१९ मध्ये या जागेवरील अतिक्रमणे हटवून ही जागा दफनभूमीसाठी रिकामी करून देण्याची मागणी केली होती. या तक्रारीच्या आधारे महापालिकेने येथील २० ते २५ गाळेधारकांना नोटीसाही बजावल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास महापालिकेने पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू केली.

या दुकानांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने ही कारवाई केल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. अतिक्रमणविरोधी पथकाने दोन जेसीबींच्या सहाय्याने कारवाई करत दुकाने जमीनदोस्त केली. आरक्षित जागेलगत आठ ते दहा गाळे झोपडपट्टी विभागात होते. त्या ठिकाणच्या पक्या बांधकामातील व्यावसायिक वापराचा भाग पालिकेने उद्ध्वस्त केला. कारवाईदरम्यान सिडको व सातपूरचे विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, पंचवटीचे नरेंद्र शिंदे, पूर्व विभागाचे राजाराम जाधव यांच्यासह सहा विभागांचे अतिक्रमण निर्मूलन पथके कारवाईत सहभागी झाले होते. यावेळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शालिमार चौकाने घेतला मोकळा श्वास

शालिमार हा परिसर गेल्या काही वर्षांत अतिक्रमणांनी झाकोळला होता. याच परिसरात कवी कालिदास नाट्यगृह असून समोरील बाजूस बीडी भालेकर मैदान आहे. तर त्यालाच लागून शहाजहानी पीरजादा कब्रस्तान आहे. मात्र या कब्रस्तानच्या जागेवर अनधिकृत बांधकाम तसेच दुकाने थाटण्यात आली होती. कपडे, शूज इतर दैनंदिन साहित्याची दुकाने असल्याने रोजच या मार्गावर गर्दी होत असते. त्यामुळे महिला वर्गासह तरुण तरुणीची नेहमीच वर्दळ असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असे. त्यामुळे महापालिकेने या अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर गुरूवारी सकाळपासून अतिक्रमण काढण्यास सुरवात केली.

व्यावसायिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम अथवा पत्र्याचे शेडचे अतिक्रमण काढून घ्यावेे अन्यथा अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल आणि कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसुल करण्यात येईल. : करुणा डहाळे, उपआयुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग