घरमहाराष्ट्रनाशिकउत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत दीड लाखांचा मद्यसाठा जप्त

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत दीड लाखांचा मद्यसाठा जप्त

Subscribe

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची सुरगाणा-उंबरठाण रोडवर कारवाई

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रविवारी, १४ एप्रिलला रात्री सुरगाणा-उंबरठाण रोडवर केलेल्या कारवाईत दीड लाखांच्या अवैध मद्यसाठ्यासह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेतील संशयित अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

लोकसभा निवडणुकीमुळे उत्पादन शुल्क विभागाची विविध पथके जिल्हाभरात कार्यरत आहेत. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा दिवस ड्राय डे असल्याने, देशी-विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या सूचनेनुसार सुरगाणा-उंबरठाण रोडवरील काठीपाडा शिवारात सापळा रचला होता. त्यात पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार (जीजे-१५, सीए-७८०२) थांबवल्यानंतर त्यात देशी मद्याचा साठा आढळून आला. वाहन रोखताच चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. मद्य साठ्यात देशी दारू टॅगोपंचच्या ९९ हजार ८४० रुपयांच्या १ हजार ९२० बाटल्या, देशी दारु प्रिन्स संत्राच्या ६२ हजार ४०० रुपये किंमतीच्या १ हजार २०० बाटल्या आढळून आल्या. मद्यसाठा व सुमारे ४ लाखांची गाडी असा सुमारे ५ लाख ६२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

- Advertisement -

कारवाईत यांचा सहभाग

या कारवाईत निरीक्षक एम. बी. चव्हाण, खांदवे, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, सहायक दुय्यम निरीक्षक पंडीत जाधव, कर्मचारी कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, महेश सातपुते, संजय सोनवणे, मच्छिंद्र आहिरे, अमन तडवी यांचा सहभाग होता. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक एम. बी. चव्हाण करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -