घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखळबळजनक! खेडलेझुंगे येथे गोदापात्रात हजारो मासे मृत

खळबळजनक! खेडलेझुंगे येथे गोदापात्रात हजारो मासे मृत

Subscribe

नाशिक : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे गोदावरी नदीवर असलेल्या बंधार्‍यावरील जलाशयात हजारो मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची घटना मंगळवारी (दि. २१) घडली. नदीतील हजार ते पंधराशे मीटर पर्यंतच्या जलप्रवाहातील पाणी पूर्णतः दुधाळ झालेले निदर्शनात आले. औद्योगिक वसाहतीतून विषारी रासायनिक पदार्थ टँकरद्वारे नदीमध्ये टाकल्याने पाणी विषारी झाल्याने मासे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नदीतील रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे परिसरात उग्र दर्प पसरल्याने नागरिकांना त्रास होत आहे. स्थानिकांनी सरपंचांकडे याबाबत तक्रार करत गस्त समिती नेमून रात्री अपरात्री घडणार्‍या प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली आहे. प्रदूषित पाणी जमिनीत मुरल्याने भूगर्भातील जलसाठाही प्रदूषित होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर दूषित दुर्गंधीयुक्त विषारी पाण्याची तीव्रता कमी करून वापरणे योग्य बनविणेसाठी पाटबंधारे विभागाकडून पाण्यातील विषारी रासायनिक पदार्थाची चाचणी करून तात्काळ पुढील प्रक्रिया राबवण्याची मागणी जोर धरत आहे.

- Advertisement -

बंधार्‍यात रसायन मिश्रित दूषित पाणी आले कुठून याचा शोध घेवून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी लासलगाव पोलिसांकडे नागरिकांनी केली आहे. उन्हाळा सुरू झाला आहे आणि पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली असतानाच हे दुष्कृत्य अज्ञात व्यक्तीने केल्याने लासलगाव पोलिसांकडे त्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आणि नदी प्रदूषित करणार्‍या घटकांवर कारवाई करण्यात करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. पाणी प्रदूषित झाल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन सर्व जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहे. बंधार्‍याच्या पूर्व दिशेस पाण्यावर मृत माशांचा खच पडला असून, जलचर सजीवांच्या मृत्युने पाणी प्रदूषित होत आहे. सर्व पाणी रसायनयुक्त दुधाळ रंगाचे झाले असून पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नदीतील पाणी हे शेती, घरगुती वापरासाठी आणि पशुधनाला पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे पिकांना अपाय होऊ शकतो, पशुधनाला पचनसंस्थेचे विविध विकार होण्याची शक्यता आहे. दुधातून हे विषारी द्रव्ये मानवी अन्नसाखळीत प्रवेशित होऊन दूध सेवन करणार्‍या घटकांनाही त्यामुळे विषबाधा होण्याचा संभव वाढला आहे.

मृत माशांच्या आणि पाण्याच्या नमुन्यांची चाचणी करून त्यातील विषारी केमिकलयुक्त पदार्थ शोधून तो निफाड, सिन्नर तालुक्यातील कोणत्या कंपनीत हे वेस्ट प्रॉडक्ट आढळते यावरून संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात यावी. : प्रसाद घोटेकर, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -