घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रफेसबूक पोस्टवरून वाद; गॅरेज मेकॅनिकचा खून

फेसबूक पोस्टवरून वाद; गॅरेज मेकॅनिकचा खून

Subscribe

नाशिक : फेसबुक पोस्टच्या वादातून दोन जणांनी गॅरेज मेकॅनिकचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१८) मध्यरात्री सातपूर येथील गोरक्षनाथ रोडवरील मळे परिसरात घडली. या घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली आहे. संतोष जयस्वाल (वय 30) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मुन्ना उर्फ राजू निशाद व नरसिंग उर्फ रामकृष्ण निशाद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गॅरेज मेकॅनिकचे काम करणारा संतोष हा सातपूरच्या काश्मिरे मळ्यात आपल्या भावासह राहत होता. त्याच परिसरात राहणार्‍या मुन्ना व रामकृष्ण निसाद यांच्यात जुना वाद होता. फेसबुक पोस्टवरून त्यांचे नेहमी खटके उडत होते. या वादातून निसाद व संतोष यांचे मध्यरात्री भांडण झाले. यात संशयीत निसाद यांनी लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर वर्मी घाव घातला. यात गंभीर दुखापत झाल्याने संतोष खाली कोसळला. त्यास तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे दोन वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. निसाद यांचे अंबड लिंकरोडवर लेथ मशीनचे वर्कशॉप असून ते मूळचे आझमगडचे आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित मुन्ना उर्फ राजू निशाद व नरसिंग उर्फ रामकृष्ण निशाद यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मृत संतोष आझमगडचा असून गावी त्याची पत्नी व मुलगी राहते. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दोन आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -