घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशेततळ्यात बाप-लेकीचा, तर धरणात बुडून दोघांचा मृत्यू

शेततळ्यात बाप-लेकीचा, तर धरणात बुडून दोघांचा मृत्यू

Subscribe

अकोले आणि इगतपुरी तालुक्यातील दुर्दैवी घटना, बुडाल्याने मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ

अकोले तालुक्यातील वीरगावच्या सुपारमाळ शिवारात घराशेजारील शेततळ्यात बुडून वडील आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत कृष्णकांत जगन्नाथ थोरात (वय 4३) आणि त्यांची दहावीत शिकत असलेली मुलगी अश्विनी कृष्णकांत थोरात (वय 16) या दोघांचा अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. तर, दुसर्‍या घटनेत इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणावर फिरायला गेलल्या तीन युवकांपैकी दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य एकाला वाचवण्यात वाडिवर्‍हे पोलिसांना यश आले.

पहिल्या घटनेत सुपारमाळ शिवारात अश्विनी राहत्या घराशेजारील शेततळ्याजवळून जात असताना पाय घसरुन पडली. तिचा आरडाओरडा ऐकून घरातील व्यक्ती पळतच शेततळ्याजवळ गेल्या. मुलीला वाचविण्यासाठी कृष्णकांत थोरात यांनी शेततळ्यात उडी घेतली. शेततळे पूर्ण भरलेले असल्याने व त्यातील कागद आणि शेवाळामुळे दोघांनाही कडेला येता न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. यादरम्यान शिवारातून आणि गावातूनही लोक जमा झाले. दीपक दातीर, करीम इनामदार यांनी शेततळ्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी त्यांचे कुटुंबियांचा आकांत हृदयद्रावक होता. मृत कृष्णकांत थोरात यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, मामा-मामी असा परिवार आहे. अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी शोकाकूल वातावरणात दोघांवर वीरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

दोघे युवक जिंदाल कंपनीतील कामगार

इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरण परिसरात पर्यटन करण्यासाठी 20 ते 25 युवक गेले होते. यापैकी तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. कमलसिंग खरकसिंग बिल्ट (२५), मनोजकुमार मोहनचंद्र जोशी (५१, दोघेही रा. उत्तराखंड, ह. मु. जिंदाल कंपनी, मुंढेगाव) अशी बुडून मृत पावलेल्या दोघा युवकांची नावे असून वाचलेल्या युवकाचे नाव अद्याप समजले नाही. तिघेही युवक मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील कामगार असल्याचे समजते. या घटनेची माहिती समजताच वाडिवर्‍हे पोलिसांनी वेगाने बचावकार्य केले. नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे निवृत्ती गुंड यांनीही तत्परतेने बचावकार्यात भाग घेतला. त्या युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. धुलीवंदनच्या  दिवशीच घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे जिंदाल कंपनी परिसरात शोककळा पसरली. वाडिवर्‍हे पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास फड आदींनी तपास सुरू केला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -