उत्तर महाराष्ट्रातील पाच शिलेदारांना मंत्रिमंडळात स्थान

जळगाव जिल्ह्यात दोन, नाशिक, नगर, नंदुरबार जिल्ह्याला प्रत्येकी एक मंत्रीपद

नाशिक : गेल्या चाळीस दिवसांपासून रखडलेल्या राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार अखेर मंगळवारी झाला. यात एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नउ तर भाजपकडून नउ जणांचा शपथविधी पार पडला. विभागनिहाय विचार करता यात उत्तर महाराष्ट्राला पाच मंत्रीपदे देण्यात येउन झुकते माप देण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातून शिंदे गटाचे मालेगावचे आमदार दादा भुसे, जळगावचे गुलाबराव पाटील यांना तर भाजपकडून नगरचे राधाकृष्ण विखे पाटील, नंदुरबारचे विजयकुमार गावित, जळगावचे गिरीश महाजन यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये एक डॉक्टर, १ डिप्लोमाधारक आहे. यामध्ये विखे पाटील हे बी.एस्सी अ‍ॅग्री पदवीधारक आहेत. तर भुसे हे डिप्लोमाधारक आहेत. गावित डॉक्टर आहेत.

विजयकुमार गावित राष्ट्रवादीतून भाजपमध्ये

विजयकुमार गावित 1995 मध्ये नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजयी झाले. पहिल्यांदा युती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर डॉ. गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2000 ते 2014 सलग नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 2014 मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करीत नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. 2019 च्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झाल्यानंतर यंदाच्या शिंदे गटातून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना आदिवासी विकास विभागात मोठ्या प्रमाण्लॄत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत.

विखेंचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा प्रवास

विखे पाटील घराण्याला मोठा सहकार आणि राजकीय वारसा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांना पहिल्यांदा शपथ देण्यात आली. त्यांचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा त्यांचा प्रवास राहिला आहे. जवळपास सहा मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनी काम केले आहे. 2014 मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला होता.