घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपावसामुळे गणेशभक्तांची तारांबळ

पावसामुळे गणेशभक्तांची तारांबळ

Subscribe

नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावल्याने गणेशभक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. तर तासाभराच्या पावसाने शहर परिसरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांच स्वरूप प्राप्त झाले होते.

बुधवारी घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी मोठया उत्साहात साजरया होत असलेल्या गणशोत्सवानिमित्त बाजारपेठ सजली आहे. गत पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने गणेशभक्तंमध्येही आनंदाचे वातावरण आहे. मात्र मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक धो धो पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे दुकानदारांची तसेच गणेशमुर्ती विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शहराच्या विविध भागात पुजा साहित्यांनी दुकाने सजली आहेत तर अनेक ठिकाणी गणेश मुर्ती विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत. दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने मुर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलमध्ये पाणी गेल्याने मुर्ती विक्रेत्यांची तारांबळ उडाली. एक दिवस आधीच लाडक्या बाप्पाला घरी घेउन जाण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांचाही उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. पावसाने शहरातील प्रमुख मार्गांवर अक्षरशः नद्यांच स्वरूप प्राप्त झाले होते. शहारातील प्रमुख रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. या पाण्यामधून मार्ग काढण्याची कसरत काही वाहनचालक करत होते.

- Advertisement -

डोंगरे वसतीगृहावर चिखलाचे साम्राज्य

दरवर्षीप्रमाणे यंदाही गंगापूररोडवरील डोंगरे वसतीगृह मैदानावर गणेशमुर्ती विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे मुर्ती विक्रेत्यांना फटका बसला मात्र यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असतांना विक्रेत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. परंतू मंगळवारी झालेल्या पावसाने डोंगरे वसतीगृह मैदानावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने मुर्ती खरेदीसाठी येथे येणारया नागरिकांचे मात्र हाल झाले. यंदा शहराच्या विविध भागात गणेशमुर्तींचे स्टॉल्स लावण्यात आल्याने अगोदरच व्यवसायावर परिणाम जाणवत असून मैदानावरील चिखलामुळे ग्राहकवर्ग पाठ फिरवतात की काय अशी भीती विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -