घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबक नगरपालिकेची गंगापात्र सफाई मोहीम सुरू

त्र्यंबक नगरपालिकेची गंगापात्र सफाई मोहीम सुरू

Subscribe

५० ट्रॅक्टर माती काढली; १५ दिवस सुरू राहणार काम

त्र्यंबकेश्वर येथे गतवर्षी पावसाळ्यात झालेली पूरपरिस्थीती यावर्षी निर्माण होऊ नये, म्हणून त्र्यंबक नगरपालिकेने मेनरोड गंगापात्राची सफाई सुरू केली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, तसेच मृत्युंजय प्रतिष्ठानचे कुणाल उगले यांनी या कामाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. यावेळेस नगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी एच. आर. ठाकरे, भाऊराव सोणवणे आदी उपस्थित होते. गंगापात्रात मोठ्या प्रमाणात माती साठली आहे. तिचा उपसा करण्यात येत आहे. आतापर्यंत 50 ट्रॅक्टर म्हणजेच जवळपास 40 ब्रास माती बाहेर काढून वाहून नेण्यात आली आहे. यापुढे आणखी 15 दिवस हे काम सुरू राहणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात कुशावर्त तीर्थ ते मंदिर यांच्या दरम्यान नदीपात्र आहे. नदीपात्रावर स्लॅब टाकलेला आहे. सत्यनारायण मंदिर चौक ते लक्ष्मीनारायण मंदिर चौक दरम्यान नदीपात्रावर असलेल्या स्लॅबवरून पावसाळयात काही वेळेस पाणी वाहते. मागील वर्षी 7 जुलै तर 11 जुलै 2018 रोजी पूर आला होता. पुराचे पाणी थेट त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसले होते. यावर्षी पुन्हा तशी परिस्थती निर्माण होऊ नये म्हणून नगरपालिका खबरदारी घेत आहे. नदीपात्रात वाहून आलेली माती काढण्यात येत आहे. मेनरोडच्या या नदीपात्राला गंगाद्वार परिसरातून म्हातार ओहळ आणि निलपर्वत येथून निलगंगा असे दोन प्रवाह येवून मिळतात. तथापि निलपर्वतचा निलगंगा प्रवाहाचा बराच भाग दोन वर्षांपासून दुसरीकडे वळविण्यात आला आहे. मात्र म्हातारओहळ प्रवाह येथे येवून मिळतो. मे 2017 मध्ये डोंगरावर चर खोदणे, झाडांसाठी खड्डे खोदणे अशी कामे करण्यात आली. मान्सून 25017 मध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे मेनरोडला पूर आला नाही. दरम्यान 2017 आणि 2018 उन्हाळ्यात झाडांसाठी मोठ्या प्रमाणात खड्डे खोदले. साहजिकच 2017 चा पावसाळा आणि जून 2018 पर्यंत बर्‍यापैकी माती वाहुन आली आणि या नदीपात्रात साठली गेली. त्याच सोबत बांधकाम करणारे नागरिक नाल्यांमध्ये डेबरीज टाकतात, भंगार फेकतात हे सर्व वाहून येते आणि नदीपात्रात साठते. त्यामुळे थोड्याशा पावसानेदेखील पूर परिस्थिती निर्माण होत आहे.

- Advertisement -

गांभीर्य लक्षात घ्या

यावर्षी नगरपालिकेने गंगा सफाई करण्याची तत्परता दाखवली आहे. त्याचसोबत नागरिकांनी खोदकाम करणे, माती, मुरूम आदी साहित्य रस्त्यालगत फेकणे, प्लास्टिक कचरा फेकणे यासाठी प्रतिबंध करण्याची आवश्यकता आहे. किमान 100 ट्रॅक्टर माती या अवघ्या 300 मीटर नदीपात्रात येऊन साचणार असेल तर याचे गांभीर्य लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -