घरमहाराष्ट्रनाशिकगोदावरी पात्रातील पानवेली काढण्यास प्रारंभ

गोदावरी पात्रातील पानवेली काढण्यास प्रारंभ

Subscribe

नागरिकांच्या मागणीला यश

गोदावरी नदीपात्रात सातत्याने वाढत असलेल्या व पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून येणार्‍या पानवेलींमुळे फरशी पुलाला अडकून मोठ्या प्रमाणात फुगवटा निर्माण होऊन परिसरातील गावांमध्ये व शेती पिकात पाणी साचते. तालुक्यातील कोठुरे येथे बाणेश्वर मंदिर हे पुरातन असून येथे दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. सध्या नदीपात्रात पानवेलींचे प्रमाण वाढल्याने परिसरातील गावांमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य वाढले असून, प्रदूषणात वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पानवेलींमुळे वाढते प्रदूषण डोकेदुखी ठरत असून, सातत्याने वाढणार्‍या या पानवेलींची शासनाने लक्ष घालून स्वच्छता करावी, अशी मागणी कोठुरे ग्रामपंचायत सदस्य सुयोग गीते यांचेसह गोदाकाठ परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली होती.

पानवेली या संपूर्ण पात्रात पसरलेल्या आहेत, सध्या पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहू लागली किंवा पूर सदृश स्थिती निर्माण झाल्यास प्रवाहाला अडथळा ठरतात. त्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतात पाणी शिरते व पिकांचे दरवर्षी नुकसान होते. पानवेलींचा पाण्याला अडथळा निर्माण झाला तर चांदोरी-सायखेडा पुलाला धोका निर्माण होतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने उशिरा का होईना पानवेलींचे गांभीर्य लक्षात घेत सायखेडा ते चाटोरी या दरम्यानसाचे पानवेली सध्या यांत्रिक बोटीच्या साह्याने काढायला सुरुवात केली आहे. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापनचे १५ जणांचे पथक हे काम करत आहे. त्यामुळे चांदोरी- सायखेड्यासह कोठुरे, करंजगाव गावांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

जलसंधारण संपदा विभागाने या वृत्ताची दखल घेत निफाड तालुक्यातील सायखेडा ते चाटोरी या एक किलोमीटर अंतरातील गोदावरी नदी पात्रातील पानवेली गुरुवार (दि. १७) रोजी बोटीच्या सहाय्याने काढण्यास प्रारंभ केला. जलसंपदा विभागाच्या वतीने पानवेली काढण्यात येत असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरवर्षी जलसंपदा विभागाकडून नदीपात्रातील पानवेली काढण्याची मोहिम राबविली जाते. ही वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा परिसरातील गावांचा एकंदरीत विचार करून पाण्याच्या प्रवाहात येणार्‍या पानवेलींचा जाळीच्या सहाय्याने अटकाव करून काढून घेतल्या तर नागरिकांची आरोग्य सुरक्षित राहील.
– सुयोग गीते, ग्रा. पं. सदस्य, कोठुरे

गोदावरीच्या पात्रात असलेल्या या पाणवेलींमुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले होते व पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढते. पाणी जवळील शेतात शिरते व पिकांचे
नुकसान होते. पानवेली काढण्यास सुरूवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
– अतुल पेखळे, नागरिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -