घरमहाराष्ट्रनाशिककारभार वार्‍यावर; पालिकेच्या ग्रीनजीम हरवल्या गवतात

कारभार वार्‍यावर; पालिकेच्या ग्रीनजीम हरवल्या गवतात

Subscribe

पंचवटी : महापालिकेचा सर्व कारभार अधिकार्‍यांच्या हाती आल्यापासून शहर समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे दुर्दैवी चित्र आहे. खड्ड्यांत गेलेले रस्ते, पाणीपुरवठ्यातील अनियमितता आणि उद्यानांची दूरवस्था यामुळे प्रशासनाचा कारभार वार्‍यावर असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सुरू झाल्या आहेत. कळस म्हणजे प्रशासनाच्या याच अनास्थेपायी नागरिकांच्या कराच्या पैशांतून शहरात विविध ठिकाणी उभारलेल्या ग्रीम जिमदेखील गवत आणि कचर्‍यात हरवल्या आहेत.

पंचवटीतील वीर सावरकर स्मारकामागील स्वामीनारायण नगरातील उद्यानात बसविण्यात आलेल्या ग्रीन जिमची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, गुडघ्याएवढे गवत वाढलेले असल्याने स्थानिकांना या जिमचा वापर करता येत नाही. पालिकेच्या जवळपास सर्वच उद्यानांमध्ये किंवा आरक्षित भूखंडांवर बसविण्यात आलेल्या ग्रीम जिमची अशीच अवस्था आहे. नाशिक शहरात नगरसेवक, आमदार व खासदार निधीतून मोठ्या संख्येने ग्रीम जिम उभारण्यात आलेल्या आहेत. ज्या भूखंडांवर हे ग्रीन जीमचे साहित्य लावले आहे त्या परिसरात कमरेएवढे गवत वाढलेले आहे तर, काही ठिकाणी पावसामुळे चिखल झाला आहे.

- Advertisement -

नागरिकांचे आरोग्य तंदुरुस्त राहावे यासाठी उभारलेल्या या ग्रीम जिम सभोवताली असलेल्या गवतामुळे अनारोग्याला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे या ग्रीन जिम वापराविना पडून आहेत. पावसामुळे उद्याने बंद असली तरीही जॉगिंग ट्रॅक, मोकळी मैदाने या ठिकाणी नागरिकांचा वावर कायम असतो. मात्र, याच ठिकाणच्या ग्रीन जिम गवतामुळे विनावापर पडून आहेत. तर, काही भागात जिमच्या साहित्याची चोरी झालेली आहे.

या ग्रीन जीम बाराही महिने म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्यात उघड्यावर असतात. त्यामुळे दोन-तीन वर्षांतच त्या निरूपयोगी ठरत असल्याचे दिसून येते. टक्केवारीच्या हेतूने ठराविक ठेकेदार आणि कंपन्यांच्या भल्यासाठी या ग्रीम जिम बसविल्या जात असल्याचीही चर्चा आहे. उद्यान विभागाकडून मोठ्या प्रमाणात बहुसंख्य उद्यानांचे देखभाल व दुरुस्तीचे काम ठेकेदारांना वार्षिक करार पद्धतीने देऊन लाखो रुपयांची बिले ठेकेदारांना अदा केली जातात. प्रत्यक्षात त्या ठेकेदारांकडून देखभाल-दुरुस्ती होते किंवा नाही, याची पडताळणी करणारी यंत्रणाच पालिकेकडे नाही. तक्रारी आल्यानंतर अधिकारी लक्ष देतात व तात्पुरती डागडुजी करतात. अशा कारभारामुळे शहरातील बोटावर मोजण्याएवढीच उद्याने आज मुलांना खेळण्यासारखी राहिलेली आहेत.

पालिकेच्या वतीने बसविण्यात आलेल्या जिमच्या सभोवती मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे जिमचा वापर करता येत नाही. आम्ही स्वखर्चाने तणनाशक फवारले आहे. उद्यान विभागाने याकडे लक्ष देत तात्काळ साफसफाई करावी. : सोमनाथ बोडके, अध्यक्ष, युवक मित्र मंडळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -