घरमहाराष्ट्रनाशिकमाऊथ फ्रेशनरच्या गोण्यांखाली लपवलेला १७ लाखांचा अवैध पानमसाला जप्त

माऊथ फ्रेशनरच्या गोण्यांखाली लपवलेला १७ लाखांचा अवैध पानमसाला जप्त

Subscribe

एफडीएची बोटॅनिकल गार्डनजवळ, नाशिक-मुंबई महामार्गावर कारवाई

नाशिक : मध्यप्रदेशातील इंदूर येथून नाशिकमार्गे चोरटी वाहतूक करणार्‍या ट्रकचा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.२०) रात्री पाठलाग करुन दोघांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, माऊथ फ्रेशनरच्या गोण्यांखाली पानमसाल्याची पाकीटे लपवल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने १६ लाख ५८ हजार ९६० लाख रुपयांचा पानमसाला, १३  लाखांच्या माऊथ फ्रेशनरसह ट्रक जप्त केला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने आयशरचा ट्रकचालक, क्लिनर, ट्रकमालक व वाहतूकदारांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ट्रकचालक अरुण राठोड (रा. इंदूर), क्लिनर सुनील मौर्या (रा. गुजरी धामनोद जि. धार), वाहनमालक मुकेश राठोड (रा. धुळे), वाहतूकदार-एमपी नॅशनल रोडवेज, इंदूर, नदीम गोलंदाज व दिलीप बदलानी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मालट्रकमधून पानमसाला व सुगंधी तंबाखूच्या साठ्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयाला मिळाली.

- Advertisement -

त्यानुसार पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर आयशर ट्रक (एमएच १८ बीजी ४०४४)चा पाठलाग करुन विल्होळीजवळील बोटॅनिकल गार्डनजवळ अडवला. ट्रकची तपासणी केली असता माउथ फ्रेशनरच्या गोण्यांमध्ये राजनिवास, विमल, रजनीगंधा पानमसाला व सुगंधी तंबाखूचा १६ लाख ५८ हजार ५६० रुपयांचा साठा आढळून आला. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यु काळे यांचे मार्गदर्शनाखाली सहआयुक्त गणेश परळीकर, सहाय्यक आयुक्त (अन्न) उदय लोहकरे, विवेक पाटील, अविनाश दाभाडे, योगेश देशमुख व गोपाळ कासार, विकास विसपुते, चालक निवृत्ती साबळे यांनी केली.

कंपन्यांची अशीही शक्कल

महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असल्याने यावर शक्कल लढवत विविध कंपन्यांनी पानमसाल्याच्या नावाखाली सर्रास गुटख्याची विक्री सुरु ठेवली आहे. या कंपन्या पानमसाला आणि सुगंधी तंबाखू अशा दोन वेगवेगळ्या पुड्या तयार करुन विक्रीसाठी पाठवतात. या दोन्ही पुड्या एकत्र केल्या की त्याचा गुटखा तयार होतो. त्यामुळे बंदी असली तरी देखील सरकारच्या डोळ्यात धूळफेक करून या कंपन्या कोट्यवधींची उलाढाल करत आहेत. विशेष म्हणजे, आजवर अनेकदा कारवाई होवूनदेखील या अवैध उत्पादनाची चोरट्या मार्गाने होणारी आयात आणि विक्री थांबलेली नाही. त्यामुळे यंत्रणांच्या भूमिकेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -