घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

नाशकात सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Subscribe

एकाच कामाचे दोनवेळा उद्घाटन

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमधील श्रेयवादाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. याच कारणावरुन पक्षाच्या पदाधिकार्‍यांसमोरच नवीन नाशिकमध्ये संघर्ष रंगल्याचा प्रकार घडला. प्रभाग २४ मधील रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन नगरसेविका कल्पना चुंभळे, प्रवीण तिदमे व राजेंद्र महाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमाला स्व. कल्पना पांडे यांचे पती चंद्रकांत पांडे यांना निमंत्रण न दिल्याने त्यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दुसर्‍या दिवशी पुन्हा त्याच कामाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले होते. यामुळे नाराज झालेल्या नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी श्रीफळ वाढवण्यास नकार दिला व पदाधिकार्‍यांच्या समोर आपली नाराजी व्यक्त करून निघून जाणे पसंत केले. या प्रकारामुळे शिवसेनेतही सबकूछ ऑल वेल नसल्याचे नागरिकांसमोर उघड झाले.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीच्या वातावरण निर्मितीपूर्वीच शिवसेना लोकप्रतिनिधींमध्ये विकासकामांचे श्रेय घेण्यावरून रंगलेला वाद नवीन नाशिक परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. नगसेविका स्व. कल्पना पांडे यांच्या निधनानंतर कामकाज पाहणार्‍या तीनही नगरसेवकांकडून विकासकामांचे उद्घाटन, तसेच लोकार्पण करण्यात येत आहे. या रस्तेकामांच्या उद्घाटनाला तीनही नगरसेवकांनी चंद्रकांत पांडे यांना आमंत्रण न दिल्याने नाराज झालेल्या पांडे यांनी स्वतःच्या अधिकारात शिवसेना पदाधिकार्‍यांना पाचारण करत त्याच कामांचे दुसर्‍यांदा उद्घाटनाचा घाट घातला.

नगरसेवक नसतानाही रस्त्याच्या कामांचे परस्पर उद्घाटन करण्याचा पांडे यांना कोणताही अधिकार नसल्याचा आरोप करत विद्यमान नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगली होती. तर झालेल्या प्रकाराबद्दल शिवसेना पदाधिकार्‍यांनीही नाराजी व्यक्त करत वाद मिटवून सहकार्याने काम करण्याचे
आवाहन केले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -