घरमहाराष्ट्रनाशिक...जेव्हा नांगरे पाटील पूर्ण करतात कॅन्सरग्रस्त सागरची इच्छा

…जेव्हा नांगरे पाटील पूर्ण करतात कॅन्सरग्रस्त सागरची इच्छा

Subscribe

आयपीएस अधिकारी व्हावं ही त्याची खरी इच्छा, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्याला कॅन्सरनं ग्रासलं आणि त्यामुळं गुडघ्यापासून पाय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तो काही क्षणांसाठी आयपीएस झालाच. सागर बोरसे असे त्या तरुणाचे नाव. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तो कॅन्सरशी लढा देत आहे.

नाशिककर असलेला सागर सध्या येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. धडाकेबाज अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याप्रमाणेच आयपीएस होण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे नांगरे पाटील त्याच्यासाठी हिरो आहेत. मात्र लवकरच पायावरील शस्त्रक्रियेमुळे त्याची इच्छा आता प्रत्यक्षात येणे शक्य नसली, तरी विश्वास नांगरे पाटील यांना भेटण्याची इच्छा मात्र त्याने डॉ. राज नगरकर यांच्याकडे व्यक्त केली. त्यानंतर डॉ. नगरकर यांनी तातडीने श्री. नांगरे पाटील यांना फोन करून तशी विनंती केली. त्यावर नांगरे पाटील यांनी तेथे येण्याचे आश्वासन दिले आणि अवघ्या काही मिनिटांतच रुग्णालयात हजर झाले आणि सागरला भेटलेही.

- Advertisement -

सागरचे स्वप्न आयपीएस अधिकारी व्हावे हे असल्याने त्यांनी त्याच्या डोक्यावर आपली ‘कॅप’ ठेवली आणि त्याच्या हातात लाठीही दिली. आपले हिरो असलेल्या आयपीएस अधिकारी नांगरे पाटील यांना पाहून सागर हरखून गेला. त्याचे स्वप्न आयपीएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्याचे मनोबल घटू नये म्हणून आयुक्त पाटील यांनी त्याला आएएस होण्याचा सल्ला दिला आणि त्याचे मनोबल वाढविले. तसेच आयएस होऊन सागराप्रमाणे समाजाचे दु:ख दूर करशील असा विश्वासही दिला. या घटनेमुळे आयुक्त नांगरे पाटील यांच्यातील माणुसकीचे दर्शन रुग्णालयातील उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना घडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -