घरमहाराष्ट्रनाशिकनियमभंगातही 'लेडीज फर्स्ट'

नियमभंगातही ‘लेडीज फर्स्ट’

Subscribe

सिग्नल जंपिंग, विना हेल्मेट आणि विना परवाना केसेस सर्वाधिक; सहानुभूतीमुळे कारवाईतून सुटका

शहरातील पुरुष वाहनचालकांच्या तुलनेत महिला वाहनचालकांची तुलनेने कमी असली तरीही, वाहतूक नियम मोडण्यात मात्र त्यांची आघाडी असल्याचे गेल्या सहा महिन्यांतील आकडेवारीवरुन पुढे आले आहे. सिग्नलचे उल्लंघन, ट्रीपल सीट आणि लायसन्स नसणे यात अशा नियमभंगात ‘लेडीज फर्स्ट’ आहेत. महिला म्हणून पोलिसांकडून जी सहानुभूती दाखवली जाते, त्यामुळे कारवाईतील आकडा कमी असल्याचे खुद्द वाहतूक पोलिस सांगतात.

शहरात दुचाकीसोबतच चारचाकी चालविणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्या तुलनेत त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नसल्याचे वारंवार पुढे आले आहे. कॉलेजरोड, गंगापूररोडवरील शिक्षण संस्था, खासगी क्लासेस अशा परिसरात विद्यार्थिनी सर्रास ट्रीपल सीट दुचाकी चालवताना दिसतात. प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार नाशिकमध्ये तब्बल १३ लाख दुचाकी आहेत. त्यातील ३५ टक्के दुचाकी या महिलांच्या हाती आहेत. म्हणजेच नाशिकमध्ये ४ लाख ५५ हजार महिला वाहनचालक आहेत. वाहन चालविण्याचा परवानाधारक (ड्रायव्हिंग लायसन्स) महिलांची संख्या मात्र अत्यल्प आहे. अपघातांची वाढती संख्या आणि त्यातील परवाना नसलेल्यांची संख्या पाहता वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांनी संयुक्त तपासणी मोहीम हाती घेण्याची गरज आहे. तसेच, महाविद्यालयीन स्तरावर प्रबोधनपर कार्यक्रमांच्या नियोजनाची आवश्यकता आहे.

- Advertisement -

आत्मविश्वास नसल्याने ‘फ्लाइट मोड’

बहुतांश महिला या गाडीवर बसल्यापासून पाय जमिनीला समांतर ठेवूनच गाडी चालवतात. अशा महिलांमध्ये आत्मविश्वास नसल्याने, त्या सुरक्षितता म्हणून पाय बाजूला ठेवून गाडी चालवताना दिसतात. बहुतांश महिला या कुठलेही प्रशिक्षण न घेता, केवळ कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने केलेल्या मार्गदर्शनानुसार वाहन चालवतात. अशावेळी लेन, इंडिकेटर, सिग्नल्स याबाबत सांगितलेच जात नाही. सरावाने महिला हे नियम शिकतात. मात्र, यादरम्यान नियमानुसार वाहन चालविणाऱ्यांची मात्र चांगलीच फजिती होते. तसेच, यातूनच अनेक अपघातांनाही निमंत्रण मिळते.

कठोर कारवाईची गरज

वाहतूक नियमांबाबत फारशी माहिती नसलेल्या महिला वाहनचालकांकडून अपघाताची शक्यता अधिक असते. त्यामुळे पोलिसांनी महिला किंवा पुरुष असा भेद न करता मोटार वाहन कायद्यानुसार सरसकट कारवाई करण्याची गरज व्यक्त होते आहे. आजही बहुतांश महिला किंवा मुली स्कार्फ लावूनच वाहन चालवतात. हेल्मेटची सर्वाधिक कारवाई मात्र पुरुषांवरच होत असल्याच्या तक्रारी आहेत.

- Advertisement -

महिला कर्मचाऱ्यांकडून नियमित कारवाई

वाहन तपासणी मोहीमेत महिला वाहनचालकांच्या तपासणीसाठी महिला कर्मचारी नियुक्त केल्या जातात. मात्र, सर्वच ठिकाणी हे शक्य होत नाही. यापुढे तपासणी मोहीमेत याबाबत अधिक लक्ष केंद्रीत केले जाईल. – अशोक नखाते, एसीपी, शहर वाहतूक शाखा

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -