लालपरी आता मालवाहतूक सेवेतही

नांदगावला 40 टन रासायनिक खते रवाना; 28 रुपये प्रती किलोमिटरने करणार वाहतूक

नाशिक: करोनामुळे लॉकडाऊन झालेल्या लालपरीची प्रवाशी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने आता मालवाहतूक सेवा सुरु केली असून पहिल्याच दिवशी 40 टन रासायनिक खते नांदगावला पाठवले आहेत. तसेच नांदगाववरुन सिमेंटच्या गोण्या घेवून गाडी नाशकात दाखल होणार आहे. यापुढे भाजीपाला, कारखान्यांतील उत्पादित माल, रासायनिक खते आदींची वाहतूक सुरुच ठेवणार असल्याचे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
एसटी महामंडळाची चाके अगोदरच आर्थिक अडचणींमध्ये रुतली आहेत. कोट्यावधी रुपये शासनाकडे धकीत असून तोट्यातील वाहतूक सुरु ठेवून संचित तोटा वर्षागणिक वाढतो आहे. अशा परिस्थितीत करोनामुळे लालपरीची चाके अचानक ठप्प झाली. प्रवाशी वाहतूक करणे अशक्य असल्याने त्यावर महामंडळाच्या उपाध्यक्षांनी उपाय सूचवत मालवाहतूक सेवा सुरु केली.22 मे रोजी याविषयी महामंडळाच्या विभागीय कार्यालयांना आदेश प्राप्त झाले. बसमधील आसने काढून घेतले आणि मागील बाजूने एक मोठा दरवाजा तयार केला. यातून माल वाहतूक करणे शक्य झाले. काही दिवसांपूर्वी नाशिकहून अहमदनगरला दोन गाड्या पाठवण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी (दि.9) 40 टन रासायनिक खते मालधक्क्यावरुन नांदगावला पाठवले. एका गाडीची वाहन क्षमता 8 टन आहे. त्यानुसार पाच गाड्या पाठविल्या. या गाड्या बुधवारी कृषी सेवा केंद्रांत खाली करण्यात आल्या. आता नांदगाव येथून सिमेंट घेवून नाशकात दाखल होणार आहे. सुरक्षित वाहतूक म्हणून एसटीकडे बघितले जाते. त्यामुळे भाजीपाला, कारखान्यातील उत्पादित माल आदींची वाहतूक करण्यासाठी एसटीकडे विचारणा होत आहे. करोनाच्या निमित्ताने थांबलेली एसटीची चाके आता पुन्हा धावणार असल्याने महामंडळाच्या अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केली आहे.

22 मेपासून एसटीला मालवाहतूक करण्यास परवानगी मिळाली आहे. त्याआधारे नाशिक विभागातून 40 टन रासायनिक खते नांदगाव येथील कृषी सेवा केंद्राना पोहोचवले. येथून सिमेंटच्या गोण्या नाशिकला येवून येणार आहोत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. कांदा, भाजीपाला, सिमेंट, रासायनिक खते, कंपन्यांमधील उत्पादीत मालाची पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक के जाणार आहे.
– कैलास पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, नाशिक