घरताज्या घडामोडीपंचवटीत पुन्हा जनता कर्फ्यु ?

पंचवटीत पुन्हा जनता कर्फ्यु ?

Subscribe

तारीख आज निश्चित होणार

नाशिक शहरात करोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मृतांची संख्याही वाढू लागली आहे. शहरातील पंचवटी आणि नाशिक मध्य हा परिसर करोनाच्या बाबतीत डेंजर झोनमध्ये आहे. शहरात आतापर्यंत आढळलेल्या करोनाबाधित रूग्ण संख्येचा विचार केला तर ७०० पैकी दोनशे रूग्ण एकटया पंचवटी भागात आहेत तर जूने नाशिक परिसरात सर्वाधिक बाधितांचे मृत्यु झाले आहे. त्यामुळे पंचवटी विभागात पाच दिवसांचा जनता कर्फ्यु करण्याची मागणी येथील नगरसेवकांनी केली आहे. याबाबत आज सर्व नगरसेवकांनी पालकमत्री छगन भुजबळ यांची भेट घेउन चर्चा केली. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि.१७) रोजी औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरात करोनाबाधितांची संख्या सातशेच्या पुढे गेली आहे. शहरात एप्रिल महीन्यांत १८ करोनाबाधित सापडले होते. मात्र जसजसे लॉकडाउन शिथिल करण्यात आले तस तसा करोनाचा संसर्गदेखील वाढू लागला आहे. विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागात करोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पहीला करोना बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर हा परिसर करोनासाठी हॉटस्पॉट ठरला. यानंतर पंचवटी विभागातील क्रांतीनगर, फुलेनगर, कोणार्कनगर, रामनगर, दिंडोरीरोड, स्नेहनगर, म्हसरूळ शिवार या भागात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पंचवटीत स्वयंस्फुर्तीने पाच दिवसांचा लॉकडाऊन करावा अशी मागणी येथील नगरसेवकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवकांनी बाजार समिती व्यवस्थापनालाही जबाबदार धरले. करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बाजार समिती व्यवस्थापनाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. येथे शेतकर्‍यांना पास देणे आवश्यक होते तसेच एकावेळी ५० वाहनांनाच परिसरात प्रवेश देणे आवश्यक असतांना एकाचवेळी वाहने बाजार समितीत प्रवेश करत असल्याने सामाजिक अंतर राखता येणे शक्य होत नाही. बाजार समितीच्या बाहेर किरकोळ भाजी विक्रेते भाजीविक्रीचा व्यवसाय करतात त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी परिसरात विविध भागातून नागरीक येत असल्याने मोठी गर्दी होते. त्यामुळे एकूणच विभागात वाढती रूग्णसंख्या विचारात घेता पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याची मागणी येथील नगरसेवकांनी भुजबळांकडे केली. मात्र पाच दिवस लॉकडाऊन केल्यास सर्व व्यवहारांवर परिणाम होईल त्यामुळे व्यावसायिकांचेही नुकसान होईल त्यामुळे नियमांचे पालन करण्याबरोबरच पाच दिवसांचा लॉकडाऊन न करता दोन दिवसांचा लॉकडाऊन करण्याबाबत विचार करावा असे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी नगरसेवक आणि परिसरातील काही ज्येष्ठ नागरीकांची बैठक बुधवारी (दि.१७) रोजी लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. यावेळी नगरसेवक मच्छिंद्र सानप, प्रियंका माने, नंदिनी बोडके, पूनम मोगरे, रूची कुंभाकर, विमल पाटील, माजी नगरसेवक समाधान जाधव, नरेश पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

शासनाशी चर्चा करून निर्णय

नाशिक शहरातील जुने नाशिक, वडाळागाव परिसरात करोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून शहरात पाच दिवसांचा लॉकडाऊन करावा अशी मागणी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी महापालीका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली. यावेळी झालेल्या बैठकीप्रसंगी आमदार राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गितेे, सभागृहनेते सतिश सोनवणे, गटनेते जगदिश पाटील उपस्थित होते. या बैठकीत करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आयुक्तांनी सादरीकरणातून करण्यात येणार्‍या उपायोजनांबाबत माहीती दिली. शहरात मोठया प्रमाणावर सायलेंट कॅरियर असून त्यांच्यामार्फत करोना विषाणूचा प्रसार होण्याचा संभव आहे. तसेच लॉकडाउन शिथील केल्यामुळे नागरिक कामानिमित्त गर्दी करत असून यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत राज्य सरकारशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे चर्चा करण्यात येऊन निर्णय घेउ असे आश्वासन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -