घरदिवाळी २०२१ऐन दीपोत्सवात अनेक गावे अंधारात

ऐन दीपोत्सवात अनेक गावे अंधारात

Subscribe

वीजबिल थकल्याने नागरिकांचे हाल, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचा सुळसुळाट

नाशिक ; वीजबिल थकलेल्या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यातील गावच्या गावे अंधारात आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर घरात काळोख पसरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या अंधाराचा फायदा घेत गावात चोर्‍यांचे प्रमाणही वाढले आहे. विद्युत पुरवठा पुर्ववत न केल्यास २५ ऑक्टोबरपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात १२०० ग्रामपंचायती आहेत. सर्वच ग्रामपंचायतींची थकबाकी असल्याने काही अपवाद वगळता सर्व गावे अंधारात आहेत. दिवाळीचा सण तोंडावर आला असून प्रकाशाचा उत्सव असणार्‍या या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील अनेक गावांमध्ये मात्र काळोख पसरला आहे. ग्रामपंचायतीने महावितरणचे वीजबिल थकविल्याने पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे सायंकाळी सातनंतरच गावात काळोख पसरत असल्याने नागरिकांना अक्षरशः मोबाईलच्या प्रकाशात वाट काढत घराकडे जावे लागत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. झाडा -झुडपांत उसाच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या कधी झडप मारेल, याचा नेम नाही, बिबट्याने ग्रामस्थांच्या समोर शेळ्या, कुत्र्याचा फडशा पाडला आहे. दोन -चार फुटाच्या अंतरावरही काही दिसत नसल्याने संपूर्ण गाव जीव मुठीत धरून जगत आहे. घरात लाईट आहे, मात्र पायरी ओलांडली की अंधाराचा सामना करावा लागतोय. वीज नसल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायतीचे पथदीप आणि पाणीपुरवठा योजनेचे वीजबिलाची छाननी करण्यासाठी शासनाने ऑगस्ट 2021 मध्ये परिपत्रक काढून समिती नेमली आहे. जिल्हा आणि राज्य पातळीवर समितीचे काम आहे. एकीकडे थकबाकीचा ताळमेळ घेऊन थकबाकीची रक्कम निश्चित होत नाही, तोपर्यंत चालू बिल ग्रामपंचायतने भरावे असा शासन निर्णय आहे. मात्र, अचानक बोजा पडत असल्याने ग्रामपंचायतींनी असमर्थता दर्शविली आहे, तर महावितरणने कोट्यवधी रुपये थकल्याच्या दावा करत ऐन सणासुदीच्या तोंडावर विद्युत पुरवठा खंडित करून गावच्या गावे अंधाराच्या खाईत ढकलली आहेत.

या आधी राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याकडून ग्राम पंचायतीच्या विजबिलाच भरणा केला जात होता. मात्र सरकारने बिल भरण्यास असमर्थता दाखवीत सर्व जबाबदारी ग्राम पंचयातीवर टाकली, अनेक गावांत लाखोंची थकबाकी आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात ग्रामपंचायतीचे उत्पन्न घटले, आहे, घरपट्टी पाणी पट्टीची वसुली नाही त्यामुळे गावातील कामांनाच पैसा नाही तर निधी वीज बिलासाठी पैसा आणायचा कुठून असा सवाल उपस्थित होत आहे, नाशिक जिल्ह्यात 1200 ग्रामपंचायती आहेत सर्वच ग्रामपंचायतीची थकबाकी असल्यानं काही अपवाद वगळता सर्व गावं अंधारात आहेत.

- Advertisement -

… अन्यथा आंदोलन

कुठलीही सूचना न देता दिवाळीच्या तोंडावर विद्युत पुरवठा खंडित केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्युत पुरवठा पूर्ववत न झाल्यास सरपंच परिषदेने 25 ऑक्टोबरपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -