घरमहाराष्ट्रनाशिकधरण सुरक्षेसंबंधी उपाययोजना सादर करा

धरण सुरक्षेसंबंधी उपाययोजना सादर करा

Subscribe

‘तिवरे’ दुर्घटनेची पार्श्वभूमी : जिल्हाधिकार्‍यांनी ‘मेरी’कडून मागवली माहिती

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनाने तातडीने पावलं उचलत धरणांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार्‍या ‘मेरी’ संस्थेकडून धरणांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील धोकादायक पुलांचीही माहिती मागवण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटून ७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेमुळे धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तिवरे धरणाची दुरुस्ती मे महिन्यात केली असल्याचे सांगण्यात येते, तरीही ही दुर्घटना घडल्याने धरणाच्या कामाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी थेट अधिकार्‍यांनाच जबाबदार धरत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तिवरे धरण दुर्घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनानेही सतर्कता बाळगत धरणांचा आढावा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात प्रामुख्याने ७ मोठे व १७ मध्यम असे २४ धरणे आहेत. याव्यतिरिक्त लघुपाटबंधारेकडील १५ मोठे, १० मध्यम व ११० असे १३५ लघुप्रकल्प आहेत. यातील गंगापूर धरणाच्या सुरक्षेबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वी गंगापूर धरण उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. राज्यातील सर्व धरणांची सुरक्षितता, संशोधन आणि अभ्यास करण्याची जबाबदारी असलेली मेरी ही संस्था नाशिकमध्ये कार्यरत आहे. राज्यभरातील धरणांची सुरक्षिततेसाठी १९८० मध्ये ’मेरी’त स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. धरणांना असणारे संभाव्य धोके ओळखणे, त्यावर उपाय शोधणे हे या विभागाचे प्रमुख काम आहे. या धरणांच्या सुरक्षेची काळजीही ‘मेरी’कडूनच वाहिली जाते. यासाठीच संस्थेकडून राज्यातील सर्व धरणांचे मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर परीक्षण केले जाते. त्याचा अहवाल तयार करून तो सरकारला सादर केला जातो. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या धरणांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचाही जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

‘मेरी’कडून उडवाउडवी

तिवरे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती कक्षातून मेरी येथील धरण सुरक्षितता संघटना मंडळ कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, साहेब बाहेर गेले आहेत, नंतर फोन करा. पुन्हा काही वेळाने फोन केल्यानंतर आता भोजनाची वेळ आहे, नंतर फोन करा, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

- Advertisement -

जिल्ह्यात ८ पूल धोकादायक

२०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सध्या एकूण ८८ हून अधिक पुलांची मालकी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील मार्गावर नऊ ब्रिटिशकालीन पूल आहेत. त्यातील आठ पूल ब्रिटीशकालीन आहे. बार्‍हे- ननाशी-गोळशी-आबेकर-घोडेगाव मार्गावरील ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे. मालेगाव-मनमाड-येवला रस्त्यावरील पांझण नदीवरील पूल दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे तो सध्या वाहतुकीस बंद आहे. उर्वरित प्रकाशा-छडवेल-सामोडा-सावळी विहीर रस्त्यावरील गिरणा, खडकी, वाघाडी पूर्व नदीवरील तीन पूल, मालेगाव शहरातून जाणार्‍या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील पूल, नाशिक बाह्य वळण रस्त्यावरील पूल, चांदवड-लासलगाव-विंचूर, सावळीविहीर रस्त्यावरील पूल हे पुरातन असून या पुलांच्या सुरक्षेचाही आढावा प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -